मोठी बातमी : महसूलमंत्री म्हणतात, १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधीही !
-उर्वरित, २१ जानेवारीच्या निकालानंतर
प्रतिनिधी
नागपूर : जिल्हा परिषद निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी ओबीसी आरक्षण असलेल्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधीही होऊ शकतात. उर्वरित, जिल्हा परिषदांच्या निवडणुका २१ जानेवारीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर होतील, असा दावा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
त्यांनी मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांनी केलेल्या बंडखोरीवरून मोठे भाष्य केले. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष अर्ज मागे घेतले जातील, असा विश्वास महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
, भाजपचे कार्यकर्ते पक्षाच्या विजयासाठी कटिबद्ध आहेत. काही कारणांमुळे नाराज झालेले कार्यकर्तेही शेवटी पक्षासाठीच काम करतील. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या सर्वांशी चर्चा करण्यात येणार असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल असेही बावनकुळे म्हणाले.
चंद्रपूर प्रकरणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, प्रदेशाध्यक्षांनी केलेली कारवाई योग्य आहे. प्रदेशने मंजूर केलेल्या उमेदवारांच्या यादीत परस्पर बदल करणे अयोग्य असून त्यामुळेच तेथील जिल्हाध्यक्षांना हटविण्यात आले आहे.
-गुन्हे दाखल असणे व दोष सिद्ध होणे वेगळे
पुण्यात गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, केवळ गुन्हा दाखल असणे आणि न्यायालयात दोष सिद्ध होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोष सिद्ध झालेल्या व्यक्तीला भाजप तिकीट देत नाही. सध्या तिकीट दिलेल्या उमेदवारांबाबत न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच भाष्य करता येईल.
–भाजप–शिवसेना महायुतीचे संकेत
महायुतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राज्य पातळीवर भाजप–शिवसेना महायुतीचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर अडचणी असल्या तरी पुन्हा एकत्र बसून जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांसाठी समन्वय साधला जाईल.
–आमदार रवी राणा यांच्याशी चर्चा करणार
अमरावतीतील परिस्थितीवर बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, आमदार रवी राणा यांच्याशी स्वतः भेटून चर्चा करणार असून ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले आहेत, ते अर्ज मागे घ्यावेत अशी विनंती करणार आहेत.
–पुण्यातही भाजपचाच महापौर
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात भाजप पूर्ण ताकदीने लढणार असून ५१ टक्क्यांहून अधिक मतांनी भाजपचे उमेदवार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला. निवडणुकीनंतर आवश्यक असल्यास मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल, मात्र जिथे भाजप लढत आहे तिथे ताकदीनेच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
–महसूल विभाग लोकाभिमुख करण्यावर भर
महसूल विभागातील निर्णयांबाबत माहिती देताना बावनकुळे म्हणाले की, आतापर्यंत ५० हून अधिक निर्णय घेतले असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. मुख्यमंत्री पांदन रस्ते योजना, बळीराजा पांदन योजना, तुकडेबंदी कायदा, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, वन स्टेट वन रजिस्ट्रेशन, मायक्रो झोनिंग, उभ्या मालमत्तांसाठी प्रॉपर्टी कार्ड, अशा निर्णयांमुळे महसूल खाते अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख होईल.


