मोठी घडामोड : राहुल गांधी यांनी घेतली या नेत्याची सहकुटुंब भेट

मोठी घडामोड : राहुल गांधी यांनी घेतली या नेत्याची सहकुटुंब भेट

-बिहारमध्ये आतापासून राजकीय हालचाली

प्रतिनिधी
बिहार : बिहार विधानसभेच्या निवडणुका पुढील काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरु केली आहे. एकीकडे एनडीए तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. तसेच बिहारमधील स्थानिक पक्षाच्या नेत्यांकडूनही मोठी रणनीती आखली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी देखील मोठी तयारी सुरु केली आहे. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (यूनाइटेड) पक्षानेही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी तयारी सुरु केली आहे. याचबरोबर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसही मैदानात उतरले आहेत.

आता आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची पाटणा येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यामुळे आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत काँग्रेस आणि आरजेडी पक्षातील संबंध ताणले गेले होते. कारण लालू प्रसाद यादव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्व करण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं. त्यामुळे काँग्रेस आणि आरजेडी पक्षातील संबंध ताणले गेल्याचं बोललं जात होतं.