मुख्यमंत्र्यांचे संकेत : नोव्हेंबरमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुका
-लाडकी बहीणविषयी मोठी घोषणा
प्रतिनिधी
मुंबई : चांदीवली येथील मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसनासाठी दिलेल्या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
या कार्यक्रमात राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. येत्या दोन महिन्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुका होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच, यावेळी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून देण्याचं आवाहन देखिल एकनाथ शिंदे यांनी केले.
याचबरोबर, मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
चांदीवलीतील प्रकल्प बाधित झोपडपट्टी धारकांना आज ४०० घरांच्या चाव्या देण्यात येत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे हे सरकार आहे. त्यामुळे विकास कामाबरोबरच कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या शासनाने गेल्या दोन वर्षात विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचे काम केले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली आहे. पुढील काळात १५०० रुपयाची रक्कम वाढविण्यात येईल. या बरोबरच महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तरुणांसाठी युवा कौशल्य प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री व मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना सुरू केल्या आहेत. तसेच, शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळावी म्हणून मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत पाच लाखापर्यंत चे मोफत उपचार देण्यात येत आहे. सर्वसामान्यांचे आयुष्यात चांगले दिवस यावेत म्हणून या कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


