मुंबईत प्रचाराला गालबोट : मुंबईत मराठी-गुजराती वाद समोर
-उद्धव ठाकरे गट पोलिसांत
प्रतिनिधी
मुंबई : मुंबई आणि उपनगरात लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने सर्व सहा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारांचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. या दरम्यान मुंबईत मराठी-गुजराती वाद समोर आला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय दिना पाटील उमेदवार आहे. त्यांच्या प्रचारासाठी घाटकोपरमध्ये उबाठामधील शिवसैनिक गेले होते. गुजराती सोसायटीत त्यांच्या प्रचारास विरोध करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केले आहे. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला आहे.
शिवसेना ‘उबाठा’चे शिवसैनिक संजय दिना पाटील यांचा प्रचारासाठी घाटकोपरमध्ये गेले. त्यावेळी मराठी पत्रके वाटण्यास त्यांना विरोध करण्यात आला. मराठी माणसांना बिल्डींगमध्ये प्रचार करु देणार नाही, असे सांगण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. सोसायटीत आम्ही परवानगी घेऊन प्रचार करत आहोत, असे त्यांनी सांगितले, त्यानंतर वाद सुरु होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला.
घाटकोपरमध्ये शिवसैनिकांना प्रचार न करु दिल्याबद्दल शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले. त्यांनी बुळचट शिवसेना आणि फडणवीस गट गांडू असल्याचे म्हटले आहे. बुळचट शिवसेना आणि फडणवीस हे या विषयावर गप्पा का? हिम्मत असेल तर त्यांनी आवाज द्या नाहीतर आम्ही बघतो काय करायचं आहे ते, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी केला.


