महायुतीचे ठरले : फडणवीस, बावनकुळे, मते मैदानात

महायुतीचे ठरले : फडणवीस, बावनकुळे, मते मैदानात

-९२ जागांची यादी फायनल

प्रतिनिधी
नागपूर : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ अजून सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाने रविवारी एकूण ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातून भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चार जागांवरील उमेदवारांचा समावेश आहे. अजून सहा जागांची घोषणा व्हायची आहे.

नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १२ जागा आहेत. महायुतीत भाजपने रामटेक ही शिवसेनेसाठी (शिंदे) सोडली आहे. उर्वरित ११ पैकी पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. दक्षिण-पश्चिममधून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा निवडणूक लढणार आहे. या मतदारसंघातील ही त्यांची चौथी निवडणूक असणार आहे. दक्षिण नागपूरमध्ये विद्यमान आमदार मोहन मते यांच्याबाबत प्रचंड नाराजी होती. तेथे या भागाचे माजी आमदार सुधाकर कोहळे इच्छुक होते. त्यामुळे भाजप भाकरी फिरवणार का ? याकडे लक्ष लागले होते. पण अखेर पक्षाने मोहन मते यांच्या पारड्यात उमेदवारी टाकली.

मते हे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जातात तर कोहळे हे गडकरी समर्थक आहेत..पूर्व नागपूरमधून चौध्यांदा या भागाचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे. ते गडकरी समर्थक आमदार आहेत. मध्य नागपूर, उत्तर आणि पश्चिम नागपूर या तीन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झाली नाही. मध्यमध्ये विद्यमान आमदार विकास कुंभारे यांच्याविषयी नाराजी आहे. तेथे विधान परिषद सदस्य प्रवीण दटके इच्छुक आहेत. पश्चिममध्येही रस्सीखेच आहे. उत्तर नागपूरमध्ये भाजपकडून नवीन चेहऱ्याचा शोध सुरू आहे. माजी आमदार मिलिंद माने हे येथून इच्छुक आहे.

नागपूर ग्रामीणमध्ये एकण सहा जागा आहेत. त्यापैकी रामटेकची जागा भाजपने शिवसेने(शिंदे) साठी सोडली आहे. उर्वरित पाच पैकी दोनच जागी उमेदवार घोषित केले. कामठीतूनचंद्रशेखर बावनकुळे आणि हिंगण्यातून विद्यमान आमदार समीर मेघे निवडणूक लढणार आहे. मेघे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. तेथे महिलांना संधी द्यावी, अशी मागणी होती.