महामानव जयंती विशेष: कधीपासून सुटी? बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सुटीचा आग्रह कुणाचा?
प्रतिनिधी
नागपूर : 14 एप्रिल रोजी जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त सरकारी सुट्टीही दिली जाते. पण ही सुट्टी कुणी मिळवून दिली, त्याची रंजक माहिती आपण या बातमीतून घेणार आहोत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोल्हापुरातील सहकारी माजी आमदार दादासाहेब शिर्के यांनी आंबेडकर जयंतीचा शासकीय सुट्टीचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. त्यानंतर त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळेच सरकारने 14 एप्रिल ही तारीख डॉ. आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी म्हणून जाहीर केली.
कोल्हापुरातील सिद्धार्थनगरात राहणारे दादासाहेब शिर्के यांचा जन्म 1907 मध्ये झाला. तर 26 डिसेंबर 1985 रोजी त्यांचे निधन जाले. शिर्के यांनी 1957 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाकडून निवडून आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच त्यांना राखीव मतदार संघातून उमेदवारी दिली होती.
–असा झाला सुटीचा प्रस्ताव पारित
शिर्के यांनी आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी देण्याचा पहिला ठराव विधानसभेत मांडला. विधीमंडळात 1958 ते 1961 या काळात अथक संघर्ष करून शिर्के यांनी हा शासकीय सुट्टीचा प्रस्ताव मंजूर करवून घेतला. विरोधी पक्षाचे सदस्य असल्यामुळे शिर्के यांच्याकडे हा ठराव पारित करवून घेण्यासाठी आवश्यक मताधिक्य नव्हते. पण त्यानंतरही त्यांनी आपले संघटनात्मक चातुर्य व वकृत्वाच्या जोरावर त्यांनी हा ठराव पारित करवून घेतला.
राज्य सरकारने 22 जून 1976 रोजी मानपत्र देऊन योग्य त्यांच्या कामगिरीचा यथायोग्य सन्मान केला. त्यात यासंबंधीच्या घटनाक्रमाचा उल्लेख आहे.
-आंबेडकरांच्या स्मृती जपल्या
वयाच्या 14 व्या वर्षी दादासाहेब शिर्के व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट सिद्धार्थनगरातील चिंचेच्या झाडाखाली निपाणीचे बी.एच. वराळे यांनी घडवून आणली. बाबासाहेब अनेकदा शिर्के यांच्या निवासस्थानी मुक्कामी असायचे. आजही ही ऐतिहासिक वास्तू शिर्के कुटुंबीयांनी जपली आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या अस्थी व त्यांच्या वापरातील काही वस्तूंचेही त्यांनी जतन केले आहे.


