महापालिका निवडणूक : हिंदुत्ववादी मतांचे विभाजनाचा फायदा नेमका कुणाला ?
-भाजपासमोर मोठे आव्हान
प्रतिनिधी
अकोला : महापालिका निवडणुकीमध्ये महायुती व महाविकास आघाडी आकारात आली नाही. काही पक्षांनी सोयीस्कर घरोबा केला. दोन्ही शिवसेना स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी मतदानाचे विभाजन होणार असून त्याचे समीकरण निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. भाजपपुढे परंपरागत विरोधकांसह मित्र पक्षाचे देखील मोठे आव्हान राहील. अपेक्षित लक्ष्य गाठण्यासाठी नेतृत्वाला चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
अकोला महापालिकेची तब्बल आठ वर्षांनंतर रणधुमाळी सुरू आहे. २० प्रभागातील ८० जागांवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढत होईल. या निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीचे बिनसले, तर आघाडीची बिघाडी झाली. भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती केली. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र निवडणूक लढत आहेत. शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर दंड थोपाटले. भाजपने ६२ जागांवर उमेदवार दिले आहेत, तर राष्ट्रवादीसाठी १४ जागा सोडल्या. ७४ जागांवर शिवसेना शिंदे गट निवडणूक लढत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ५५, काँग्रेस ४९ व राष्ट्रवादी शरद पवार गटाने २४ उमेदवार दिले आहेत. भाजपमध्ये उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा होती. भाजप नेतृत्वाने गुजरात पॅटर्न राबत अनेक माजी नगरसेवकांना डच्चू दिला. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आहे. भाजपने ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी दिली. भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी तत्काळ इतर पक्षांच्या मार्गाने जात उमेदवारी दाखल केली. अंतर्गत नाराजी, नवखे उमेदवार व मतविभाजन अशा तिहेरी आव्हानांचा सामना भाजपला करावा लागणार आहे.
भाजपतील तिकीट कापलेल्या माजी नगरसेवकांना शिवसेना शिंदे गटाने आधार देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. शिवसेना शिंदे गट स्वबळावर असल्याने त्यांनी सर्वाधिक उमेदवार दिले. त्याखालोखाल भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असल्याने त्यांच्यात हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होणार असल्याचे निश्चित आहे. या मतविभाजनाचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे बहुतांश ठिकाणी भाजप व शिवसेनेच्या दोन्ही गटात लढतीची शक्यता दिसून येते. निवडक प्रभागात वंचित आघाडीचा बऱ्यापैकी प्रभाव असल्याने भाजपला त्यांच्यासोबत देखील दोन हात करावे लागतील. मुस्लीम बहुल भागांमध्ये काँग्रेसपुढे ‘एआयएमआयएम’चे आव्हान असेल. मुस्लीम मतांचे सुद्धा विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मतविभाजन हा कळीचा मुद्दा ठरेल. ते टाळण्याचे प्रयत्न उमेदवारांसह पक्षांना करावे लागतील.


