मणिपूरमध्ये काढला या पक्षाने भाजपाचा पाठिंबा
-केंद्रातील परिस्थितीवरून सांशकता
प्रतिनिधी
बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) पक्षाने मणिपूरमधील भाजपा सरकारचा २२ जानेवारी रोजी पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मणिपूरमध्ये सध्या मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं सरकार सत्तेत आहे. मात्र, मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची अधिकृत घोषणा जनता दल (युनायटेड) पक्षाने केल्यामुळे फक्त मणिपूरच्या राजकारणात नाही तर देशाच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली. कारण नितीश कुमार यांचा जनता दल (युनायटेड) पक्ष केंद्रात एनडीएमध्ये सहभागी आहे. एवढंच नाही तर केंद्रातील भाजपाच्या सरकारला जनता दल (युनायटेड) चा पाठिंबा आहे. मग असं असतानाही मणिपूरमधील भाजपाच्या सरकारचा पाठिंबा जनता दल (युनायटेड) पक्षाने का काढला? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
जनता दल (युनायटेड) पक्षाची २०२२ पासून भाजपबरोबर युती होती. मात्र, आता जनता दल (युनायटेड) पक्षाने सरकारपासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता मणिपूरमध्ये जनता दल (युनायटेड) विरोधी बाकावर असणार आहे. जनता दल (युनायटेड) पक्षाचे मणिपूरमध्ये एकूण सहा आमदार होते. मात्र, सहा आमदारांपैकी पैकी पाच आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर जनता दल (युनायटेड) पक्षाचा एकच आमदार राहिला. आता एक आमदार असतानाही जेडीयूने भाजपा सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जनता दल (युनायटेड) पक्षाच्या मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना पत्र लिहित सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर राज्यात मोठी राजकीय चर्चा सुरु झाली. मात्र, असं असताना जनता दल (युनायटेड) च्या एकमेव आमदाराच्या जवळच्या काही सूत्रांनी दावा केला आहे की जनता दलाने मणिपूरच्या सरकारचा पाठिंबा काढलेला नाही. तसेच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानेही त्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.


