बिहार निवडणुकीत या कारणावरून आहे एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा
-एकनाथ शिंदेंबरोबर घडले ते नितीश कुमारांबरोबर…
प्रतिनिधी
बिहार : बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शह देण्यासाठी विरोधकांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. यादरम्यान बिहारच्या राजकारणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. राज्यात पुन्हा एनडीएला सत्ता मिळाल्यास भाजपाचाच मुख्यमंत्री होणार, अशी आवई उठली आहे. महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदेंबरोबर घडलं ते नितीश कुमारांबरोबरही घडणार, असा कयास अनेकांनी बांधला आहे. या सर्व घडामोडींवर जनता दल युनायटेड पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली.
साधारणत: विधानसभा निवडणुकीआधी विविध राजकीय पक्षांकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले जातात. बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. विशेष बाब म्हणजे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अद्यापही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच आगामी निवडणूक लढवली जाणार असल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निकालानंतर एनडीएचे आमदार एकत्र बसून मुख्यमंत्र्यांची निवड करणार असल्याचे सांगितले, त्यामुळे नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार की नाही, याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. अमित शाह यांनी केलेल्या विधानाला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय नाट्याची पार्श्वभूमी आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये भाजपाने मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतरही शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही.
त्यांच्या जागी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी मोहन यादव यांची निवड केली. २०२४ मध्येही भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हाच पॅटर्न राबवला होता.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्यानंतर महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले.
शिंदे यांच्या हातातून मुख्यमंत्रिपदाची सूत्रे जाण्याला कारणीभूत महायुतीचे संख्याबळ ठरल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून केला जातो.


