बावनकुळे स्पष्ट बोलले, अजितदादा म्हणतात, भाजपाची भूक राक्षसी!

बावनकुळे स्पष्ट बोलले, अजितदादा म्हणतात, भाजपाची भूक राक्षसी!

-पिंपरी-चिंचवड महापालिका रणसंग्राम

प्रतिनिधी
नागपूर : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. भाजपाच्या स्थानिक नेत्यांना भ्रष्टाचारातून परिवाराला मोठे करण्याची राक्षसी भूक लागली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपावर केली. तसेच माझ्यावर ज्यांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते, आता मी त्यांच्याबरोबरच सत्तेत आहे, असेही ते म्हणाले होते.

अजित पवारांच्या बदललेल्या सूराबाबत आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीवर या टीकेचा काय परिणाम होणार?, याचेही उत्तर दिले आहे. त्यामुळे महापालिकेची रणधुमाळी सुरू असताना राज्यातील सत्तेसाठी बावनकुळेंचे वक्तव्य महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवारांनी महापालिकेनिमित्त भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांचा वेगळ्या मार्गाने जाण्याचा इरादा दिसत आहे. भाजपा खा खा खातोय आणि त्यांना खाणे सोयीचे व्हावे, यासाठी त्यांनी इतर पक्षातील खाणाऱ्या लोकांना बरोबर घेतले आहे. भाजपा पक्ष लूट करत असेल, भ्रष्ट मार्गाने मालमत्ता गोळा करत असेल आणि सत्तेतील उपमुख्यमंत्री अशाप्रकारचा आरोप करत असतील तर याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

काय म्हणाले, बावनकुळे ?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांच्या टीकेनंतरही महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे सांगितले. बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. समन्वय समितीच्या बैठकीत एकमेकांवर टीका न करण्याचा निर्णय झाला होता. त्या भूमिकेशी सुसंगत नसलेले वक्तव्य झाले असले तरी त्याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

महापालिकेची निवडणूक भावनांवर नव्हे तर विकासावर आधारित असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भाषणात विकासावरच चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनता विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला मतदान करेल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये मुख्यमंत्री स्वतः जाणार असून मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चर्चा-संवाद आणि माध्यमांशी मुलाखती घेणार आहेत.

ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यावर टीका
करताना बावनकुळे म्हणाले की, कितीही जाहीरनामे दिले किंवा जहरी टीका केली तरी जनता त्याकडे लक्ष देणार नाही. ही निवडणूक भावनिक नसून विकासावर लढवली जाणार आहे. जनता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला मतदान करेल, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला साथ देईल, असा दावा त्यांनी केला.