बच्चू कडूंना मंत्री न करताच दिव्यांग मंत्रालय!
-शिंदे सरकारमध्ये दोन मंत्रिपदे वाढणार
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे.
दिव्यांगांसंदर्भात काल, बुधवारी मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली. याच बैठकीमध्ये राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
देशात पहिल्यांदाच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. आपण आज मंत्रालयासमोर लाडू वाटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.”ज्यांना हात नाहीत, पाय नाहीत, चालता-बोलता येत नाही, दिसत नाही, त्यांच्यासाठी हा मोठा निर्णय आहे. दिव्यांगांच्या लढ्यामध्ये हे आमचं मोठे यश आहे” अशा भावना आमदार कडूंनी व्यक्त केल्या. या मंत्रालयाची जबाबदारी बच्चू कडू यांच्याकडेच येईल, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.


