पुन्हा भाजप ! या ठिकाणच्या निवडणुकीत मिळविला दणदणीत विजय

पुन्हा भाजप ! या ठिकाणच्या निवडणुकीत मिळविला दणदणीत विजय

-निवडणुका ‘हायजॅक’ केल्याचा विरोधाकांचा आरोप

प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपाने आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होत असताना सत्ताधारी पक्षाने केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. दादरा नगर हवेली आणि दीव दमण येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने १२२ पैकी तब्बल ९१ जागा (सुमारे ७५%) बिनविरोध जिंकल्या आहेत. काँग्रेसने मात्र या निवडणुकीवर आक्षेप घेतला असून त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजपाने निवडणूक आयोगाशी संगनमत करून या निवडणुका ‘हायजॅक’ केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या आरोपानुसार, या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षातील सुमारे ८० टक्के उमेदवारांचे नामांकन अर्ज फेटाळण्यात आले, त्यामुळेच भाजपाच्या अनेक उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दादरा नगर हवेली आणि दीव दमण येथील उर्वरित जागांसाठी आज, बुधवारी निवडणूक होणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

भाजपाने जिंकलेल्या जागा

केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४८ जिल्हा परिषदेच्या जागांपैकी ३५ जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
हा आकडा पक्षाच्या मागील नऊ वर्षांच्या कामगिरीच्या तुलनेत तिप्पट आहे.
तसेच ४४ ग्रामपंचायतींपैकी ३० आणि ३० नगरपालिकेच्या जागांपैकी २६ जागांवर भाजपाने बिनविरोध विजय मिळवला आहे.
२०२० साली या प्रदेशांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतीच्या १५० जागांपैकी ८४ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आणि त्यापैकी ४७ जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या होत्या.
मात्र, नोव्हेंबर २०२० मध्ये करोना काळात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने प्रदेशातील सर्व स्थानिक संस्था आपल्या ताब्यात घेतल्या होत्या, असे पक्षातील एका सूत्रांनी सांगितले.