पुन्हा नागपुरात दिग्गज्यांचा मेळा; हे मान्यवर येणार
– 5 आणि 6 जानेवारी महिला विज्ञान काँग्रेस
प्रतिनिधी
नागपूर : महिला विज्ञान काँग्रेससाठी देशभरातून जवळपास 5 हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. यामध्ये शहरी करिअर महिलांपासून ते आदिवासी महिलांपर्यंत महिलांच्या सक्षमीकरणाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा भाग म्हणून हा कार्यक्रम 5 आणि 6 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. 5 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एस. चंद्रशेखर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. कल्पना पांडे यांनी दिली. प्रमुख पाहुण्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या आणि सेलिब्रिटी टीना अंबानी, सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त “सीड मदर” राहीबाई पोपरे यांचा समावेश आहे.
आरटीएम नागपूर विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसमधील हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे, असे डॉ. पांडे यांनी सांगितले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे 80 हून अधिक वक्ते महिला सक्षमीकरण आणि कल्याणाच्या विविध क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि अनुभव शेअर करतील.
–आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांची उपस्थिती
आदिवासी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन भारत सरकारचे आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अधिवेशनाचे निमंत्रक डॉ. शामराव कोरेती यांनी दिली.


