परखड भूमिका : प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षणावर स्पष्ट बोलले

परखड भूमिका : प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षणावर स्पष्ट बोलले
– रयत मराठ्यांनी निजामी मराठ्यांच्या नादी लागू नये

प्रतिनिधी
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावर अत्यंत परखड भूमिका मांडली आहे. निजामी मराठा नेत्यांच्या आंतरवाली सराटीतील भेटीमुळे ओबीसी व रयत मराठ्यांत तणाव वाढला आहे. रयत मराठ्यांनी निजामी मराठ्यांच्या नादी न लागता प्रयत्न केले, तरच त्यांना शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळू शकेल, असे आंबेडकर म्हणालेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘हायकोर्टाने मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला असताना, एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण ह्या तथाकथित मराठा नेत्यांना किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सत्तेत असणाऱ्या नेत्यांना सुप्रीम कोर्टात गरीब मराठ्यांसाठी आरक्षण का टिकवता आले नाही?

त्यांची आंतरवली सराठी येथे भेट आणि त्यांची पोकळ आश्वासने ही सर्व नौटंकी आहे. तसे नसते तर त्यांनी ‘रयत मराठ्यांसाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण’ ह्या न्याय्य मागणीसाठी प्रयत्न केले असते, ताकद उभी केली असती, धोरण बदलायला दडपण आणले असते.

उलट निजामी मराठा नेत्यांच्या भेटीमुळे ओबीसी आणि रयत मराठ्यांच्यामध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे सर्व रयत मराठ्यांना माझे आवाहन आहे. ह्यातून दंगल न घडवता ही मार्ग निघू शकतो. निवडणुकीत जाती आधारित नाही तर मानवी मूल्यांवर, न्याय्य मागण्यांसाठी भूमिका घ्या. ह्याच मार्गाने आपल्या आरक्षणाची मागणी कोणत्याही समाजाला न दुखावता प्रभावी पध्दतीने पुढे रेटता येईल,’ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘गत काही वर्षांत सातत्याने रयत मराठ्यांना त्यांची आरक्षणाची रास्त मागणी मिळवून देण्यात तथाकथित मराठा नेतृत्व अपयशी ठरले आहे. रयत मराठ्यांनो स्वतःच्या ताकदीवर उभे रहा. निजामी मराठ्यांच्या मागे जाऊ नका. तरच तुम्ही स्वतःसाठी शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळवू शकाल,’ असेही प्रकाश आंबेडकर आल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणालेत.

दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीत गत 10 दिवसांपासून उग्र आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू आहे. आतापर्यंत आंदोलक व सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फैरी झडल्यात. पण त्यातून अद्याप सर्वमान्य तोडगा निघाला नाही. त्यातच जरांगे यांची प्रकृती दिवसागणिक खालावत असल्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळण्याची भीती आहे.