पंतप्रधान यांना धमकी; हे दोन नेते अशांना हुडकून काढतील
-आमदार बावनकुळे यांचे वक्तव्य
प्रतिनिधी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. या संदर्भातील बातमी थोड्या वेळापूर्वीच बघितली. अशा धमक्यांना आम्ही भीक घातली नाही. केंद्र आणि राज्य सरकार दोघेही सक्षम आहेत. त्यामुळे अशी धमकी ज्यांनी दिली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचा शोध घेतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
गुजरातमधील प्रचारावरून नागपुरात परत आल्यावर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यपाल ज्या दिवशीपासून महाराष्ट्रात आले, तेव्हापासून शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्यावर ते गेले. शिवरायांच्या बाबतीत जे विषय आतापर्यंत आले, त्यामध्ये त्यांनी संवेदनशिलपणे काम केले आहे. त्यांच्या रोजच्या बोलण्यामध्ये, भाषणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. ज्यांनी कधीही इतिहासाला आणि शिवरायांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला नाही. भाजपचा कुठलाही कार्यकर्ता छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन काम करतो. जगात त्यांचे स्थान कमी करू शकत नाही. पण ज्या दिवशी राज्यपालांनी ते वक्तव्य केले. त्या दिवशी शरद पवार, नितीन गडकरीसुद्धा त्या मंचावर होते. या नेत्यांचा गौरव करण्याचा त्यांचा हेतू होता. पण महाराजांना कमी लेखण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असे आमदार बावनकुळे म्हणाले.
-मला राजकीय वादात पडायचे नाही
मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाठराखण अजिबात करत नाही. ते बोलले आणि छत्रपती शिवाची महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा हेतू असेल तर ते चुकीचे आहे. त्यांचे समर्थन कुणीच करणार नाही, असेही ते म्हणाले. राज्यातील राजकीय स्थिती गोंधळलेली आहे. उद्या काहीही होऊ शकतं. त्यावर दोन महिन्यांत शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असे संजय राऊत म्हणाले. याबाबत बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, राजकीय वादात न पडता विकासाची कामे करू, असे दानवेंनी म्हटले आहे. राजकारणात उद्या काय होईल, हे कुणालाही सांगता येत नाही. नुकतेच आपण पाहिले की, उद्धव ठाकरेंच्या हुकूमशाहीला कंटाळून त्यांचे ५० आमदार बाहेर पडले आणि त्यांचे सरकार पडले. पण हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल.
-आगामी काळात संख्याबळ १८४
सद्यःस्थितीत आमचे संख्याबळ १६४ आहे आणि आगामी काळात ते १८४ होईल. त्यामुळे संजय राऊतांना आता यावर अधिक काही बोलू नये. आमचे सरकार स्थिर आहे. सरकार पडण्याची कुठलीही शक्यता नाही. याउलट, दररोज आमचे संख्याबळ वाढत चालले आहे. नवनवीन प्रवेश आमच्याकडे होत आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना ५०० च्या वर लोकांनी आमच्या पक्षात प्रवेश घेतले. यामध्ये जिल्हा परिषद पातळीवरील नेते, काही माजी आमदार आणि नगरसेवकांचा समावेश आहे. आमचे सरकार दररोज चांगले निर्णय घेत आहे आणि जनतेला दिलासा देत आहे, असे आमदार बावनकुळे म्हणाले.


