पंकजा मुंडेची नाराजी स्पष्ट: फडणवीसांसोबत कार्यक्रम टाळला

  • पंकजा मुंडेची नाराजी स्पष्ट: फडणवीसांसोबत कार्यक्रम टाळला

– राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

प्रतिनिधी
बीड : आज बीडमधील गहिनीनाथ गडावरील एका कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर येणार होते. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत चांगलीच उत्सुकता होती. मात्र, आता पंकजा मुंडे यांनी अचानक आपला गहिनीनाथ गडावरील दौराच रद्द केल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाच्या नेत्यांनी पंकजा मुंडेंसाठी मातोश्रीचे दार सदैव उघडे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा आजचा दौरा अचानक रद्द करण्यामागे अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जात आहे. पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चाही आता पुन्हा जोरात सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, आज आपण अचानक दौरा का रद्द केला?, याबाबत अद्याप पंकजा मुंडे यांनी खुलासा केलेला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच ‘स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा’, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा समावेश असलेल्या कार्यक्रमाचा दौरा रद्द करत पंकजा मुंडे यांनी भाजपला इशारा तर दिला नाही ना?, असाही सवाल विचारला जात आहे.

देवेंद्र फडणवीस कार्यक्रमात एकटेच नेते
बीडच्या आष्टी तालुक्यातील गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊ यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गहिनीनाथ गडावरील दौरा रद्द झाला आहे. धनंजय मुंडे हे रुग्णालयात असल्याने ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. पंकजा मुंडे यांनीही गहिनीनाथ गडावरील दौरा रद्द केला आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनीही पहिल्यांदाच हा दौरा रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या गडावरील कार्यक्रमाला आता फक्त देवेंद्र फडणवीस हे एकटेच जाणार आहेत.

-पहिल्यांदाच त्यांनी हा दौरा केला रद्द

पंकजा मुंडे दरवर्षी सातत्याने गहिनीनाथ गडावर येत असतात. पण पहिल्यांदाच त्यांनी हा दौरा रद्द केल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याने ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि सुनील शिंदे यांनी त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. या ऑफरवर पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे गहिनीनाथ गडावरून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे काय भूमिका मांडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, पंकजा मुंडे यांनी अचानक हा दौरा रद्द केल्याने याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. तसेच, पंकजा मुंडेंनी अचानक दौरा रद्द केल्याने पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येण्याचा योगही टळला आहे.

.-चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात

दरम्यान, पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहे. दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे असल्याने पंकजा मुंडेंनी गहिनीनाथ गडावरील दौरा रद्द केला असावा. पंकजा मुंडे कधीही भाजप सोडून जाणार नाहीत. पंकजा मुंडेंचे आणि माझे रोज बोलणे होते. माध्यमांत चुकीच्या चर्चा केल्या जात आहे.