नागपूर एमआयडीसीतून चोरीच्या वाहनाच्या विल्हेवाटीचे रॅकेट
-शहर पोलीस अलर्ट
प्रतिनिधी
नागपूर : मागील १५ दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरातून बेपत्ता टेम्पोट्रकचा एमआयडीसी पोलिसांनी शोध लावत अमरावती येथून एका चोरट्याला व ट्रकचे तुकडे करून विल्हेवाट लावणाऱ्या दुसऱ्या आरोपीला रविवारी अटक केली. चोरीच्या वाहनाच्या विल्हेवाटीच्या अमरावती कनेक्शनमुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मयूर रामा भगत(२७, रा. आनंदनगर, नाग मंदिरजवळ, संभाजी चौक, खोलापुरी गेट, अमरावती) व त्याला मदत करणारा तौफिक रफिक शेख(३२, रा. मुस्कान नगर, शरीफ मशीदजवळ, पो. नागपुरी गेट, अमरावती), अशी आरोपींची नावे आहे. आरोपी मयूर हा फिर्यादी व वाहनमालक अर्जुन शीतला प्रसाद सिंग (३६, रा. बी/१, ४०१, राय टाउन) याच्याकडे काही महिन्यांपूर्वी चालक म्हणून काम करायचा. मध्यंतरी, काही वाद झाल्याने काम सोडले. या भागातील अनेक मालवाहतूक वाहने ही नागपूर नागरिक बँकेसमोर उभी करण्यात येतात. इथेच त्यांचे ट्रान्सपोर्ट ऑफिससुद्धा आहे. ही बाब आरोपी मयूरला माहिती होती. त्याने एमआयडीसी परिसरातील एम्बसी हॉटेलजवळ उभा पांढऱ्या रंगाचा टाटा टेम्पो क्रमांक एमएच ४०/एन ४३२४ पळवून नेला व आरोपी तौफिक शेखला विकला. वाहनाचे स्पेअर पार्ट्स वेगळे करून विल्हेवाट लावली. एकीकडे फिर्यादीने चोरीची तक्रार दाखल केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साबळे व पथकाने गुन्हास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. टेम्पो हा आरोपी मयूरने चोरल्याचे निष्पन्न झाले. आरोपीच्या परिसरात सापळा लावून पोलिसांनी शोध घेतला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली व चोरी केलेला टेम्पो हा त्याचा मित्र तौफिकला विकल्याचे सांगितले. त्यावरून आरोपी तौफिकला ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना नागपूरला आणण्यात आले. आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४११, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ठाणेदार भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रशांत साबळे, पोहवा ओमप्रकाश खंडाते, राजेश वरठी, विजय जाणे, सचिन सोनवाने, अश्विन मिश्रा यांनी केला.
– हरविलेले मोबाइल केले त्यांच्या मालकांना स्वाधीन
मोबाइल हिसकावणे, पळून नेणे व चोरीला जाण्याच्या प्रमाणात सर्वत्र मोठी वाढ झाली आहे. परंतु, या चोरट्यांच्या वेळीच मुसक्या आवळून व असे मोबाइल सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळविणे सोपी झाले आहे. हे मोबाइल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्याची मोठी मोहीम गिट्टीखदान पोलिसांनी यशस्वी केली. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर सव्वा दोन लाख रुपये किमतीचे मोबाइल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मूळ मालकांकडे सोपविण्यात आले.
याविषयीचा कार्यक्रम गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पार पडला. परिमंडळ क्रमांक दोनचे डीसीपी संदीप पखाले, सदर विभागाच्या एसीपी विजयालक्ष्मी हिरेमठ यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे, पोलीस निरीक्षक गुन्हे विनायक कोळी, पोलीस हवालदार प्रेमकुमार धुर्वे, नायक पोलीस शिपाई कमलेश शाहू, पोलीस शिपाई विक्रम ठाकूर आदींनी ही कारवाई केली. जयंत भाटखोरे, निखिता बिनकर, सतीश खोब्रागडे, दिनेश हरिणखेडे, प्रफुल्ल मेंढे, पुतन अली, मनोज राव, नंदा भुसारी, रजत ढोबरीकर, सुरेखा दुबे, रोहित चौधरी व राजेंद्र कच्छवाह रा. सर्व गिट्टीखदान यांना हे मोबाइल परत करण्यात आले. या मोबाइलची किंमत दोन लाख १० हजार ९०० रुपये इतकी आहे. मोबाइल परत मिळाल्याने मोबाइलधारकांनी पोलिसांचे आभार मानले आहे.
-भिवापूर राष्ट्रीय लोकन्यायालयात २०५ प्रकरणे निकाली
स्थानिक दिवाणी व फौजदारी न्यायालयात तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे शनिवारी (१३ ऑगस्ट) आयोजन करण्यात आले. यात ३९७ प्रकरणांपैकी २०५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. चार लाख ९९ हजार ७७३ रुपयांची वसुली करण्यात आली. न्यायालयात प्रलंबित दिवाणी दावे व फौजदारी व दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे नऊ प्रकरणे निकालात काढण्यात आली. फौजदारी प्रकरणात आठ हजार ४०० रुपये वसूल करण्यात आले. दाखलपूर्व स्टेट बँक व बँक ऑफ इंडियाच्या चार प्रकरणात समझोता होऊन एक लाख ७५ हजार रुपयां ची वसूली करण्यात आली. इतर दाखलपूर्व ३९७ प्रकरणांपैकी २०५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये चार लाख ९९ हजार ७७३ रुपयांची वसुली करण्यात आली. राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दिवाणी न्यायाधीश एस. जे. लाड पॅनल प्रमुख म्हणून तर अधिवक्ता पी. एल. नागोसे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. यशस्वितेसाठी सामाजिक कार्यकर्ते नरहरी पेंदाम, न्यायालयीन कर्मचारी व्ही. बी. देवकर, साहाय्यक अधीक्षक, सुरेंद्र तारेकर, वाय. एन .ढोक, लघुलेखक बुरबुरे, आ. ज्ञा. फुलझेले, एल. एम. वासेकर आदींनी सहकार्य केले.


