नागपुरात हे काय चाललंय ? शासनाची ही योजना भाजपा आमदारांच्या भागात

नागपुरात हे काय चाललंय ? शासनाची ही योजना भाजपा आमदारांच्या भागात

-संविधान चौकात आंदोलन

प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्यावतीने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु केवळ भाजपचे आमदार असलेल्या भागातच योजना राबविण्यात येतात, असा आरोप करीत बांधकाम कामगाराच्या योजनांचा लाभ विरोधी पक्षाचे आमदार असलेल्या आमदारांच्या मतदारसंघातील कामगारांना मिळावा यासाठी राष्ट्रवादीचे (शरद पवार) जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी सलील देशमुख म्हणाले, जोपर्यंत बांधकाम कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपला हा लढा सुरु राहणार आहे. उपमुख्यमंत्री आज त्यांच्या मतदारसंघात आयोजित बांधकाम कामगार मेळाव्याला आले होते. त्या पार्श्वभूमीवर संविधान चौकात आंदोलन करुन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. परंतु पोलिसांनी हा मोर्चा आकाशवाणी चौकात अडवला. यानंतर सलील देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु आम्हाला कामगार आयुक्तांची भेट घेवून बांधकाम कामगारांचे निवेदन द्यायचे असल्याची विनंती सलील देशमुख यांनी पोलिसांना केली. यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात पोलीस सलील देशमुख यांना घेवून गेले. परंतु कामगार आयुक्त यांनी भेट देण्यासाठी टाळाटाळ केली. भाजपाच्या दबावाखाली अधिकारी काम करीत असल्याचा आरोप सलील देशमुख यांनी केला व कामगार आयुक्त कार्यालयातच ठिया आंदोलन सुरू केले.