नागपुरात शशी थरूरांच्या प्रचारदौऱ्यांकडे ३३ दिग्गज नेत्यांची पाठ
-मतदार नसलेल्या नेत्यांच्या गराड्यात थरूर
-राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक
प्रतिनिधी
नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवार शशी थरूर यांनी आपल्या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ नागपुरातून केला. परंतु, त्यांच्या प्रचाराचा नारळ हा मतदार नसलेल्यांच्या गोटातून झाला. त्यामुळे राजकीय वतुर्ळातून तर्कविर्तक व्यक्त होत आहे. त्यांच्या दौऱ्याकडे ३३ दिग्गज मतदारांनी पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले.
या प्रकाराची काँग्रेस पक्षातील अनेक नेता, पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा होती. काटोलचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांचा किल्ला सांभाळला. त्यांनी काँग्रेसला मेजर सर्जरीची गरज असल्याचे सांगितले होते. ही कसर थरूर यांच्या रूपाने भरून काढली जाईल, असे सुद्धा सूचविले. पक्षातील एका बड्या पदाधिकाऱ्या च्या मते, देशमुख स्वत: अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक मतदार यादीत नाही. दरम्यान, स्वत:हुन थरूर यांनी आपण उमेदवार म्हणून मतदारांच्या भेटी घेणे अपेक्षित होते. परंतु, पक्षांतर्गत थरूर यांचे स्वागत आणि शिष्टाचाराचा भाग म्हणून तरी ३३ बड्या नेत्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. थरूर सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवार नाही. ते पक्षांतर्गत उमेदवार आहे. ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती शेवटी पक्षाचा चुकीचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितो, असे म्हणणे काही पदाधिकाऱ्यांचे आहे. थरूर यांनी दोन दिवसीय दौऱ्यात दीक्षाभूमीला भेट व इतर कार्यक्रमांना उपस्थिती लावली. रविवारी(२ ऑक्टोबर)वर्धा सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. अध्यक्षपदाच्या निवडीनंतरचे ‘काँग्रेसव्हिजन’ त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान स्पष्ट केल्याची माहिती आहे. थरूर यांचे प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसचा दलित चेहरा व ज्येष्ठ नेते मल्लिाकार्जुन खरगे मैदानात आहे. एकाअर्थी थरूर यांच्या कार्यक्रमातील दिग्गज मतदारांची अनुपस्थिती खरगे यांचे बळ वाढविणारी असल्याचे बोलले जाते.
– नागपुरातील दिग्गज मतदार
मुकूल वासनिक, अविनाश पांडे, विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, अनिस अहमद, मुन्ना ओझा, आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, उमाकांत अनिहोत्री, विशाल मुत्तेमवार, प्रफुल्ल गुडधे, पुरुषोत्तम हजारे, प्रशांत धवड, गिरीश पांडव, बंटी शेळके, दीपक काटोले, नितीन कुंभलकर, माजी मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे, आमदार राजू पारवे, सुनीता गावंडे, जि़प़अध्यक्षा रश्मी बर्वे, सुरेश भोयर, महिला जिल्हाध्यक्ष कुंदा राऊत व इतर.


