नागपुरात ‘शर्म करो मोदी, शर्म करो’, आंदोलन 

नागपुरात ‘शर्म करो मोदी, शर्म करो’, आंदोलन 
– सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास का सांगितले?

प्रतिनिधी
नागपूर : पुलवामा घटनेवरून राज्यभर वातावरण चांगलेच तापत आहे. सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास का सांगितले? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री यांनी सत्य का लपवले? असे प्रश्न करीत पुलवामा घटनेवर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात नागपूर काँग्रेसने रस्त्यावर उतरुन ‘शर्म करो मोदी, शर्म करो’, आंदोलन केले.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत मोदींना जाब मागितला. अतुल कोटेचा, सोशल मीडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, मनोज सांगोळे, रमेश पुणेकर यांच्यासह आघाडी संघटना, सेल, विभागचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यासंदर्भात बोलताना शहराध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले की, पुलवामा घटनेने सारा देश हादरला होता. सीआरपीएफच्या ४० जवानांना स्फोटाने उडवून देण्यात आले. एवढी मोठी घटना घडली तरी अद्याप या घटनेचे सत्य बाहेर आलेले नाही. या घटनेच्या तपासाचे काय झाले? या स्फोटात ३०० किलो आरडीएक्स वापरण्यात आले. ते कुठून आले? जवानांना विमानसेवा का पुरवली नाही? गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? असा सवाल ठाकरे यांनी केला.

पुलवामा घटना ही सरकारची चुक आहे, असे सत्यपाल मलिकांनी सांगितल्यावर त्यांना गप्प राहण्यास का सांगितले? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने दिलेली नाहीत. या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारला द्यावीच लागतील. पुलवामा घटनेवर सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारची झोप उडवल्याने या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपा सरकारने कितीही प्रयत्न केला तरी जनता त्यांच्या कारस्थानाला बळी पडणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.