नागपुरात विकास विरुद्ध ‘विकास’, अशी थेट लढत

नागपुरात विकास विरुद्ध ‘विकास’, अशी थेट लढत

-जातीचे राजकारण की विकासाला कौल

गजानन ढाकुलकर
नागपूर : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथे सामाजिक क्रांती केली ती दीक्षाभूमी नागपूरचीच. हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही नागपूरचेच आणि भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यस्थानी असलेले शहरही नागपूरच. अशी विविधाअंगी ओळख असलेले नागपूर सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी आले आहे. कारण येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असून त्यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्याशी आहे. गडकरींनी केलेला विकासाचा दावा विरुद्ध काँग्रेसचा विकास अर्थात विकास ठाकरे, असे या लढतीचे स्वरूप आहे.

महायुतीचे नितीन गडकरी व महाविकास आघाडीचे विकास ठाकरे या दोन्ही उमेदवारांची काही बलस्थाने आणि काही उण्या बाजू असून नागपूरकर मतदारांना यातून एकाची निवड करायची आहे. गडकरी यांच्या जमेच्या बाजूंमध्ये बलाढ्य संघटनात्मक बळ, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचारातील सक्रिय सहभाग, गडकरींनी पहिल्या पाच वर्षांत शहरात केलेला पायाभूत सुविधांचा विकास, राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्थांचे जाळे. सिमेंट रस्ते, उड्डाण पूल ही दृश्य स्वरूपातील विकास कामे आदींचा समावेश होतो. या शिवाय गडकरींची स्वत:ची ‘विकास पुरुष’ अशी प्रतिमा आणि ते राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमामुळे सर्व समाजघटकांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीची भावना आहे. याबाबी निवडणुकीत त्यांची बाजू भक्कम करणाऱ्या आहेत. दुसरीकडे कोट्यवधींची विकास कामे झाली तरी स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांची स्थिती जैसे-थे असणे, सर्वत्र सिमेंटीकरणाला नागरिकांचा असणारा विरोध, पुरामुळे झालेली लक्षावधींची हानी, त्यातून निर्माण झालेला संताप, दहा वर्षांत रोजगार निर्मितीत आलेले अपयश, त्यामुळे वाढलेली बेरोजगारी या त्यांच्या उण्या बाजू ठरतात.