नागपुरात या बड्या नेत्याचा दावा : 9 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू
– या मंत्र्यावर गंभीर आरोप
प्रतिनिधी
नागपूर : वॉशिंग मशीनमध्ये धुवून कितीही स्वच्छ केले तरी येत्या 10-12 दिवसांत गंभीर स्वरूपाचे आरोप असणाऱ्या 9 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
गंभीर आरोप असतानाही काही मंत्र्यांना गोमूत्र शिंपडून आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केल्या जात आहे. मात्र “जिद्दी दाग निकलतेही नही’ अशी परिस्थिती या 9 मंत्र्याची झाली आहे. या 9 मंत्र्याची नावे सध्या सांगू शकत नाही. पण हे 9 मंत्री विद्यमान मंत्रिमंडळात राहाणार नाहीत हे स्पष्ट आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले.
हसन मुश्रीफ यांच्यावर पीएमएलए कोर्टाने गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारला थोडीतरी ईमानदारीची चाड असेल, तर हसन मुश्रीफ यांना त्या पदावर एक मिनिटही ठेवू नये. त्यांनी त्यांची तत्काळ मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करावी, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
या 9 भ्रष्ट मंत्र्यांवर आम्ही आरोप केले नाहीत. हे आरोप भारतीय जनता पक्षाने केलेल्या तक्रारी व आरोप आहेत. त्या तक्रारीनंतरच यांच्यावर चौकशी व ईडीने नोटीस बजावली होती, असे ते म्हणाले. सध्या जागा वाटपाचे सूत्र दिल्लीमध्येच ठरत आहे. प्रदेश अध्यक्षांकडून विभागीय कार्यकर्त्याच्या बैठीकचे सत्र कोकणपासून सुरू झाले आहे. नागपूरला 12 तारखेला बैठक होणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यात रूग्णालयात सुरू असलेल्या मृत्यूसत्रात रुग्णालयाचा दोष नसून सरकारचा दोष आहे. त्यामुळे सरकारवर कलम 302 चा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. तीन-तीन वेळा स्वच्छतेचे टेंडर काढल्यावर देखील टेंडर पास करीत नाही. 40% च्यावर स्वच्छता कामगार नाही, निधी उपलब्ध नाही. रुग्णांना उपचार व औषधी वेळेवर मिळू शकली नाही. यामध्ये दोष कुणाचा आहे. त्याकरिता सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.


