नागपुरात या नेत्याच्या प्रचारासाठी प्रियांका गांधीचा सव्वा दोनतास रोड शो
-उमेदवार जिंकणार की हरणार ?
गजानन ढाकुलकर
नागपूर : अनेक वर्षांपासून काँग्रेस नेत्यांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा उपराजधानीत रविवारी होणारा सव्वा दोन तासाचा रोड शो आणि वडसा येथील जाहीर सभेमुळे नेते, कार्यकर्ते उत्साहात आले आहेत. आपल्या मतदारसंघात त्यांनी यावे, यासाठी उमेदवार व त्यांच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच चालल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांचा मार्ग निश्चित झाला नव्हता. आज, शनिवारी राहुल गांधी विदर्भात प्रचार दौरा करणार आहेत.
प्रियांका गांधी यांचे येत्या रविवारी सकाळी ११.३० वाजता येथे विशेष विमानाने आगमन होईल. लगेच त्या हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज येथे जाहीर सभेसाठी रवाना होतील. दुपारी १२.१५ ते १.१५ वाजेपर्यंत एक तास त्या सभेस उपस्थित राहतील. यानंतर हेलिकॉप्टरने नागपूरला आमगन होईल. लगेच त्यांचा रोड शो होणार आहे.
मतदारसंघांत सव्वा दोन तासांचे रोड शो आहेत. २ वाजून ५ मिनिटांनी विमानतळापासून रोड शो प्रारंभ होईल. यानंतर २.३० वाजता दुसरा सुरू होईल. हा रोड शो सव्वा तासाचा आहे. ३.५० वाजता तिसरा टप्पा आहे. अर्धा तास म्हणजे ४.२० वाजेपर्यंत तो चालेल. पश्चिम नागपुरात अहबाब कॉलनी, चोपडे लॉन, जाफरनगर, दिनशॉ फॅक्टरी मार्गे बोरगाव चौकात समारोप होणार आहे. प्रियांका गांधी सायंकाळी ४.३० वाजता दिल्लीला रवाना होतील. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा २००४ साली नागपुरात रोड शो झाला होता. यानंतर सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नागपूर-विदर्भात बऱ्याच सभा झाल्या.
प्रियांका गांधी यांच्या दौऱ्यानिमित्त उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्याकडून नियोजन करण्यात असून शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी तयारीसाठी आज, शनिवारी १० वाजता बैठक बोलावली आहे.


