नागपुरात भाजपात असे काय झाले ? रुसवे, फुगवे बाहेर आले
-मंडळ अध्यक्ष निवडीवरून नेत्यांमध्ये घमासान
प्रतिनिधी
नागपूर : पक्षांतर्गत मतभेदापासून कोणताही पक्ष वेगळा राहू शकत नाही, भाजपही त्याला अपवाद नाही, फक्त या पक्षातील मतभेद जाहीरपणे बाहेर येत नाही, त्यावर चर्चाही होत नाही. पण सत्ता आली की तिचे काही अवगुणही पक्षाला चिटकतात. भाजपचेही तेच झाले. नागपुरात मंडळ अध्यक्ष नियुक्तीहून या पक्षाचे मतभेद, रुसवे, फुगवे अखेर जाहीरपण पुढे आले.
भाजपमध्ये सध्या लोकशाही पद्धतीने पदाधिकाऱ्याची निवड प्रक्रिया जोरात सुरू आहे, हा पक्ष देशात सर्वात मोठा कसा आहे हे बिंबवण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहे. सर्वच प्रक्रिया एकमताने होत असल्याचेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर या दोन प्रमुख मतदारसंघातील मंडळ अध्यक्ष निवडीवरून नेत्यांमध्ये घमासान माजले आहे. मुद्दा आहे नियुक्त करताना विश्वासात न घेण्याचा आणि आरोप केले आहेत पक्षाच्या दोन माजी आमदारांनी. त्यामुळे भाजपमध्ये चाललेय काय याचा अंदाज येऊ शकतो. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष दर आठवड्याला नागपुरात येतात. त्यांनाही याबाबत माहिती नसावी हे आश्चर्य आहे.
पश्चिम नागपूरमध्ये मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, असा संताप या भागाचे माजी आमदार सुधाकर देशमुख आणि २०२४ ची निवडणूक पश्चिममधून लढलेले भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी मंडळाची ही यादी जाहीर होणार होती त्याच्या एक दिवसआधीच या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोहळेंच्या मते त्यांनी पक्षाचा आदेश आल्यावर पश्चिममधून निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाला असला तरी या मतदारसंघात पक्षांतर्गत नियुक्ती करताना आपल्याला विश्वासात घेणे अपेक्षित होते.


