नागपुरात भाजपाच्या बड्या नेत्याचे विधान: म्हणाले भाजपाने घराणेशाही…?
-भ्रष्टाचार विरहित सत्ता दिली
प्रतिनिधी
नागपूर : भारतीय जनता पक्षाने या देशातल्या घराणेशाही राजकारणाला एक फुल स्टॉप दिला आहे. घराणेशाहीमुळे येणाऱ्या हुकुमशाहीला पूर्णविराम देण्यात भाजपाला यश आल्याची माहिती भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली. भाजपाच्या स्थापनादिनी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहाण्यासाठी आले असता ते बोलत होते.
भाजपा हा सत्तेसाठी नाही तर सत्ता ही समाज परिवर्तनाचे साधन आहे हे मानून काम करणारा पक्ष याची खूणगाठ प्रत्येक कार्यकर्त्याने मनाशी बांधली आहे. सत्ता हे साधन आहे साध्य नाही. परिवर्तनाचे काम गतीने होण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा पूर्ण झोकून देऊन काम करेल, असेही ते म्हणाले.
- उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका ही अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारी नसल्याचे तावडे म्हणाले. राजकारणाची एक वेगळी परंपरा आहे. मला आठवते की मी विरोधी पक्ष नेता असताना सत्ताधाऱ्यांवर प्रचंड टीका केली होती. पण त्या नंतर आम्ही एका केबिनमध्ये जेवलो होतो. महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे की एकमेकांच्या पक्षाच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय उपस्थित राहातात. भारतात इतर ठिकाणी अशी परंपरा पाहायला मिळत नाही.


