नागपुरात प्रियांका गांधीच्या ‘रोड शो’त यांनी घातला राडा
-पोलिसांचा उडाला गोंधळ
प्रतिनिधी
नागपूर : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांचा नागपूर मध्य मतदारसंघात भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं. पण या रोड शोला गालबोट लागणारी घटना आज घडली. प्रियंका गांधी यांचा रोड शो संपत असतानाच संबंधित परिसरात एका चौकात भाजप कार्यकर्ते तिथे आले. त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचं काम केलं. पण तरीदेखील भाजप कार्यकर्त्यांकडून पक्षाचा झेंडा फडकवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.
संबंधित घटना जिथे घडली तो परिसर संघ मुख्यालयाचा परिसर आहे. या परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून प्रियंका गांधी यांच्या रोड शोला विरोध करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे झेंडे दाखवत निदर्शने केली. सुरुवातीला भाजप कार्यकर्त्यांकडून इमारतींवरुन झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर कार्यकर्ते रस्त्यावर आले. कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले.


