नागपुरातून या नेत्यांना संधी! हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार

नागपुरातून या नेत्यांना संधी! हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार
-पालकमंत्री फडणवीसच

प्रतिनिधी
नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल. त्यातील पाचही आमदारांत स्पर्धा आहे. पक्ष नेतृत्व कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालते, हे पाहणे चर्चेचा विषय ठरले आहे.

2014 मध्ये मोदी लाटेत नागपूर शहर आणि जिल्ह्यांत भाजपाचे 11 आमदार निवडून आले होते. पाच वर्षांनंतर लाट ओसरल्यानंतर यातील फक्त पाच निवडून आले. आता नागपुरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.यात नागपूरमधून शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांना लाॅटरी लागू शकते, अशी दाट शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपद द्यायचे नसल्याने प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले. सध्या उपमुख्यमंत्री फडणवीस हेच पालकमंत्री आहेत. तेच राहतील, असे बोलले जाते.

दक्षिण-पश्चिमचे आमदार देवेंद्र फडणवीस हे सध्या उपमुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण दटके, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, हिंगण्याचे आमदार समीर मेघे व कामठीचे टेकचंद सावरकर आहेत.

यात प्रवीण दटके व समीर मेघे हे फडणवीस आणि गडकरी या दोघांशीही सख्य आहे. कृष्णा खोपडे यांची ही चौथी वेळ आहे. परंतु, दरवेळी त्यांची गाडी ऐन वेळेवर सुटते. मोहन मतेंची लगभग दिवाळी आहे. राज्यमंत्री म्हणून नंबर लागलाच तर दोघांची शक्यता अधिक असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणने आहे.

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांनंतर कामठीचे आमदार विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांना कॅबीनेट मंत्रीपद देत राज्याचे ऊर्जामंत्री करण्यात आले. 2019 मध्ये नितीन गडकरी आणि स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी लाख प्रयत्न करूनही त्यांना तिकीट देण्यात आले नाही. त्यांच्या जागी जि. प. सदस्य टेकचंद सावरकर निवडून आले. नंतर मात्र भाजपाच्या सत्तेला हादरे बसले. पदवीधर मतदारसंघात संदीप जोशी यांचा पराभव करीत काँग्रेसचे अभिजित वंजारी निवडून आले.

शिक्षक मतदारसंघात नागोराव गाणार तिसऱ्यांदा निवडून आले. आताही त्यांचीच उमेदवारी पुढे करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी भंडारा-गोंदिया विधान परिषदेच्या संघात नागपूरच्या परिणय फुके यांना पाठविले होते. अतिशय अवघड वाटणारी निवडणूक त्यांनी जिंकली. त्यांनी या मतदारसंघावर माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे असलेले निर्विवाद वर्चस्व मोडून काढले.