नागपुरातील या विधानसभा मतदार संघात सर्वाधिक बंडखोरांनी फोडला राजकीय पक्षांना घाम

नागपुरातील या विधानसभा मतदार संघात सर्वाधिक बंडखोरांनी फोडला राजकीत पक्षांना घाम

-आमदार विकास ठाकरेंची परीक्षा

प्रतिनिधी
नागपूर : पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात यंदा महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. बंडखोरी आणि उमेदवारी नाकारल्याने भाजपसमोर वर्चस्व टिकवण्याचे आव्हान उभे आहे. तर सलग दोन विजयांनंतर काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्यासाठी नगरसेवकांची संख्या वाढवण्याची महत्त्वाची परीक्षा ठरणार आहे.

या मतदारसंघात महापालिकेचे प्रभाग क्रमांक १०, ११, १२, १४ आणि १५ हे शंभर टक्के आहेत. तर प्रभाग क्रमांक ९ आणि १३ काही भाग समाविष्ट आहे. या मतदारसंघातील सात प्रभाग मिळून २४ नगरसेवक आहेत.

प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपने दोघांना एबी फॉर्म दिला होता. त्यापैकी पहिल्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला, तर किसन गावंडे यांचा अर्ज अवैध ठरला. मात्र स्थानिक नागरिकांनी गावंडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून त्यांच्या घराला बाहेरून कुलूपही लावण्यात आले होते. या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी वाटपावरून मतभेद चव्हाट्यावर आले होते. विधानपरिषदेच्या एका सदस्याने मध्यस्थी केल्यानंतर गावंडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. मात्र कार्यकर्त्यांमध्ये ही घटना अद्याप विस्मरणात गेलेली नाही.

प्रभाग क्रमांक १० मध्ये मानकापूर, बोरगाव, पोलीस लाईन टाकळी, अवस्थीनगरचा समावेश आहे. येथे माजी नगरसेवक अरुण डवरे यांच्या पत्नी सीमा डवरे रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या वैशाली चोपडे आहेत. या प्रभागात काँग्रेसला चारही जागा जिंकण्याचा विश्वास आहे.

प्रभाग क्रमांक ११ मध्ये गोरेवाडा, झिंगाबाई टाकळी, गोधनी रोड, मानकापूर फरस या भागांचा समावेश होतो. येथे भाजपचे माजी नगरसेवक संदीप जाधव यांच्याविरोधात काँग्रेसच्या मंजू चाचेरकर उभ्या आहेत. याच प्रभागात भाजपच्या माजी नगरसेवक संगीता गऱ्हे विरुद्ध काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे, तसेच भाजपचे भूषण शिंगणे विरुद्ध काँग्रेसचे शैलेश पांडे यांच्यात अतिशय चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये दाभा, सुरेंद्रगड, मकरधोकडा, वाडी टेकडी या वस्त्यांचा समावेश आहे. येथे काँग्रेसमधून आलेल्या दर्शनी धवड यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने सुकेशनी देशभ्रतार यांना संधी दिली आहे. या दोघींमध्ये अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. याच प्रभागात भाजपचे विक्रम ग्वालवंशी यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी नगरसेवक व बंडखोर कमलेश चौधरी शड्डू ठोकून उभे आहेत.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये सिव्हिल लाईन्स, सदर, गवळीपुरा, खाटीकपुरा, मरारटोली या वस्त्यांचा समावेश आहे. या प्रभागात भाजपमध्ये बंडखोरी झाली असून माजी नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी भाजपच्या प्रगती पाटील यांना आव्हान दिले आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये धरमपेठ, रामदासपेठ, शंकरनगर, शिवाजीनगर, सीताबर्डी या भागांचा समावेश आहे. येथे भाजपचे माजी नगरसेवक सुनील हिरणवार यांच्याविरोधात काँग्रेसने संदेश सिंगलकर यांना मैदानात उतरवले आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य प्रकाश गजभिये लढत असून त्यांची थेट लढत भाजपचे योगेश पाचपोर यांच्याशी आहे.