नागपुरातही मंत्री अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यांचा निषेध
-राजभरातील महिला संघटना आक्रमक
-सत्तारांचा तातडीने राजीनामा घ्या
प्रतिनिधी
मुंबई/ नागपूर : नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, महिला आयोगाच्या सदस्या आभाताई पांडे, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात मंत्री अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यांचा निषेध करण्यात आला.
हिंदुत्वाच्या मुद्यावर गद्दारी करीत स्थापन झालेल्या सरकारचे मंत्री महिलांबाबत असे चुकीचे वक्तव्य करीत असतील तर हा जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीबाईंचा तसेच महाराष्ट्राचा तसाच महिलांचा घोर अपमान आहे. हे आम्ही सहन करणार नाही.
जर कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेतला नाही तर त्यांना नागपूर शहरात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली.
– सत्तारांविरोधात तक्रार दाखल करणार
‘इतकी भिकारXXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ’, असे वादग्रस्त वक्तव्य करून कृषिमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले. याप्रकरणी सत्तारांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा, पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला. तर सत्तार यांना राज्यात फिरून देणार नाही, असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होताच, अब्दुल सत्तार यांनी कुणाची मने दुखवले असतील, तर सॉरी म्हणत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत सत्तारांच्या घरी धडक देत आंदोलन केले.
-काय म्हणाले होते सत्तार?
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची एका वृत्तवाहिनशी बोलताना जीभ घसरली. सत्तार म्हणाले की, ‘इतकी भिकारXXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ. ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत. आमचे खोके आणि त्यांचे डोके तपासावे लागेल. ज्यांना खोक्याची आठवण येऊ लागली आहे, त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके-खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो’, असे सत्तार म्हणाले.
-विद्या चव्हाण बरसल्या, तिघांचा राजीनामा घ्या
कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी मुंबईत सत्तारांचे घर गाठत दगडफेक केली. सत्तारांच्या घरांच्या काचा फोडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि बलात्कारी आरोपीला वाचवणाऱ्या रवींद्र चव्हाण या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा त्यांना मंत्रालयात बसू देणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिला.
-सत्तारांनी मागितली माफी
प्रकरण पेटताच सत्तारांनी सॉरी म्हणत मी कोणाबद्दलही काही बोललो नाही. कोणत्याही महिलांची मने दुखावली असे बोललो नाही. कोणाला वाटले असेल, तर मी खेद व्यक्त करतो, म्हणत माफी मागितली. मी फक्त खोक्याबद्दल बोललो. महिलांबद्दल एक शब्दही बोललो नाही. पुढेही बोलणार नाही. मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. सॉरी, असे म्हणत सत्तारांनी माघार घेतली. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली.
-आदित्य ठाकरेंनी घेतला समाचार
अब्दुल गद्दार राज्याचे घटनाबाह्य कृषिमंत्री आहेत. त्यांनी सुप्रिया सुळेंबद्दल घाणेरडे शब्द वापरले आहेत, अशी घाण केंद्रातील भाजप सरकारला हवी आहे का, असा सवाल सोमवारी युवासेनाप्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुलढाण्यात बोलताना केला. गुलाबराव पाटील असो की, मुंबईचा तो आमदार. हे सर्व चाळीस गद्दार महाराष्ट्राचे वातावरण खराब करीत आहे. ते ही फक्त राक्षसी महत्त्वकांक्षा असलेल्या व्यक्तीसाठीच, अशी टीकाही त्यांनी केली. अब्दुल सत्तारांवर काही कारवाई होईल का? आज शेतकरी त्रस्त आहे पण ते गलिच्छ प्रकार करीत आहेत. मला नाव ठेवा पण महिलेंवर टीका करणे अयोग्य नाही.
-40 गद्दारांकडून वातावरण खराब
आदित्य ठाकरे म्हणाले, एकाच्या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळे चाळीस गद्दारांनी राज्याचे वातावरण खराब केले आहे. परवा गुलाबराव पाटील तसेच बोलले. आज दुसरे गद्दारही तसेच बोलले. मुंबईत एका गद्दार आमदाराने दोन लोकांना धमकावले. राजकारणाची पातळी आणखी किती खाली नेणार. कायदा सुव्यवस्था राज्यात आहे का, महिला सुरक्षा आहे का भाजप चाळीस गद्दारांसोबत राहणार की, काही कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे.


