दबाव वाढला : राज्यातील भाजपा करणार ओबीसी जनगणनेची मागणी
-चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
प्रतिनिधी
नागपूर : भाजप एक पक्ष म्हणून सत्ताधारी महायुती सरकारकडे ओबीसी जनगणनेची मागणी करणार असल्याचे सूतोवाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातही बिहारसारखी जातनिहाय जनगणना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
–आशिष देशमुख यांची विनंती
आशिष देशमुख यांच्या या विनंतीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप एक पक्ष म्हणून शिवसेना, भाजप व महायुतीच्या सरकारकडे ओबीसींची गणना करण्याची मागणी करेल, असे स्पष्ट केले. ते भाजपच्या ओबीसी जागर यात्रेत बोलत होते. बिहारच्या अहवालानंतर आशिष देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारने ओबीसींची आर्थिक सामाजिक आकडेवारी गोळा करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार भाजप सरकारला असा सर्वे करून त्यासंबंधीची आकडेवारी जारी करण्याची मागणी करेल, असे बावनकुळे म्हणाले.
–काँग्रेसचा दबाव
उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर देशभरात जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारची चांगलीच गोची झाली आहे. विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रातही ओबीसींची जनगणना करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यातच नितीशकुमार यांनी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जारी केल्यामुळे आता सरकारवर अशी गणना करण्याचा मोठा दबाव वाढला आहे.


