तर्कवितर्क : मोदींनी पाठविला अडाणीमार्फत पवारांना खास निरोप

तर्कवितर्क : मोदींनी पाठविला अडाणीमार्फत पवारांना खास निरोप

-पुन्हा राज्याच्या राजकारणात सस्पेन्स

प्रतिनिधी

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपशी हातमिळवणी करणार असल्याची चर्चा होत असतानाच प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींनी गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे २ तास चर्चा झाली. त्याचा तपशील मात्र जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी सस्पेन्स निर्माण झाला आहे. अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचा काही ‘विशेष निरोप’ घेऊन तर अदानी पवारांना भेटले नसतील ना? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.

चर्चेचा तपशील गोपनीय ठेवल्याने राजकीय वर्तुळातून असे लावले तर्कवितर्क *हिंडेनबर्गप्रकरणी अदानी समूहाची जेपीसी चौकशीच्या मागणीस विरोध केल्यामुळे पवार यांचे आभार मानण्यास आले असावेत अदानी. *जेपीसी मुद्द्यावर चर्चेसाठी काँग्रेसने पुढील आठवड्यात दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावली. त्यात इतरांचेही मन वळवण्यासाठी पवारांना साकडे घातले असावे. *सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाविरोधात गेल्यास राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता टिकवण्याची भाजपची धडपड सुरू आहे. त्यास अजितदादा व ४० आमदार तयार आहेत. पण शरद पवार राजी नाहीत. त्यांचे मन वळवण्यासाठी भाजपचा ‘निरोप’ घेऊन आले असावे अदानी. *राजकारणी व उद्योगपतींच्या मैत्रीत गैर काय, वेगळे अर्थ काढू नये, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. *या दोघांचे जुने संबंध आहेत. पवार यांचे सहकार्य घेण्यासाठी अदानी गेले असतील, असा टोला काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला.

राऊतांमार्फत ठाकरेंपर्यंत भेटीचा वृत्तांत अदानी-पवार भेटीनंतर उद्धव सेनेत मात्र अस्वस्थता निर्माण झाली. अदानी निघून गेल्यानंतर काही वेळातच खासदार संजय राऊत यांनी पवारांचा बंगला गाठला व अर्धा तास चर्चा करून भेटीमागील उद्देश पवारांकडून जाणून घेतला. नंतर ही माहिती उद्धव ठाकरेंनाही कळवली. राऊतांचा निरोप येईपर्यंत उद्धव यांनीही भेटीबाबत प्रतिक्रिया देणे टाळले. अजितदादांचा गट भाजपसोबत जाण्याची धास्ती उद्धव सेनेला आहे.पवारांशी चर्चेनंतर राऊतांनीही पत्रकारांना काहीच न सांगितल्याने या भेटीचा ‘सस्पेन्स’ वाढला आहे.

यापूर्वीच्या भेटीगाठी ठरल्या रंजक * २०१४ च्या विधानसभा निकालानंतर अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतरच राष्ट्रवादीने न मागता भाजपला पाठिंबा दिला. * १६ जून २०२२ : बारामतीतील पवारांच्या संस्थेतील एका कार्यक्रमास अदानी प्रमुख पाहुणे होते. पवारांचे नातू आमदार रोहित यांनी त्यांच्या कारचे सारथ्य केले होते. त्यानंतर चार दिवसांत शिवसेनेमध्ये बंड होऊन ठाकरे सरकार पडले. * २२ सप्टेंबर २०२२ : मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची अदानींनी ‘मातोश्री’वर भेट घेऊन २ तास गोपनीय चर्चा केली होती. नंतर ते लगेचच भाजप नेते आशिष शेलारांनाही भेटले.