गुलाबराव पुन्हा बोलले : नवरदेवाचा किस्सातून दिला घरचा आहेर
-पदाधिकाऱ्यांवर केली नाराजी व्यक्त
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच नेत्यांनी आपआपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणीला जोरादार सुरुवात केली आहे. अनेक नेत्यांचे राज्यातील विविध मतदारसंघात दौरे सुरु आहेत. तसेच उमेदवारांची चाचपणीही केली जात आहे. यातच महायुतीमध्ये विधानसभेच्या काही जागांवरून धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. यातच शिवसेना (शिंदे) नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये भर सभेत भारतीय जनता पार्टीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी गुलाबराव पाटील यांनी भाजपाला इशाराही दिला. “त्यावेळी ते नवरदेवाकडून होते आणि आम्ही नवरीवाले होतो. आता आम्ही नवरीवाले आहोत, ते नवरदेवाकडून आहेत”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
जळगावमध्ये महायुतीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्याला भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे भर कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. गुलाबराव पाटील म्हणाले, ” भारतीय जनता पक्षाची आमची मंडळी बोलावल्यानंतरही या मेळाव्यासाठी आलेले नाहीत. पण यावर आम्ही मार्ग काढू, त्यांना विनंती करू. आता त्यावेळी ते नवरदेवाकडून होते आणि आम्ही नवरीवाले होतो. आता आम्ही नवरीवाले आहोत, ते नवरदेवाकडून आहेत. त्यामुळे आम्ही यासंदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत”, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.


