कोण म्हणाले, अर्थसंकल्प दोन, चार उद्योगपतींना समोर ठेवून मांडू नका

कोण म्हणाले, अर्थसंकल्प दोन, चार उद्योगपतींना समोर ठेवून मांडू नका

-ठाकरे गटाचा खोचक सल्ला

प्रतिनिधी
नवी दिल्ली : दोन, चार उद्योगपतींना समोर ठेवून केंद्रीय अर्थसंकल्प मांडू नका. देशातील मजूर, शेतकरी, सामान्यांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करा, असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला दिला आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा आर्थिक पाहणी अहवाल तसेच अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले.

देश आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात

संजय राऊत म्हणाले, काही वर्षांपासून देशाची स्थिती म्हणजे दोघेच खरेदी करतात आणि दोघेच विकतात, अशी झाली आहे. त्यामुळे देश आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात गेला आहे, तो आणखी खड्ड्यात जात आहे.

संजय राऊत म्हणाले, आम्ही अर्थसंकल्पाकडे सामान्यांच्या दृष्टीकोनातूनच पाहणार आहोत. अदानी, अंबानींच्या विचारांनी अर्थसंकल्पाकडे आम्ही पाहणार नाही. केंद्र सरकारनेही केवळ एक, दोन उद्योगपतींचे हित न बघता सर्वसामान्यांचा प्रामुख्याने विचार करुन त्यांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्प सादर करावा. अन्यथा हिंडनबर्गसारख्या एखाद्या संस्थेच्या अहवालानेही देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते.

-धमक्यांमुळे आम्ही परराज्यात गेलो

संजय राऊत यांच्या धमक्यांमुळे आम्ही परराज्यात गेलो, असा दावा शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगासमोर केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, मी शिंदे गटाला धमकी देतोय, असे शिंदे गट आता बोलत आहेत. मात्र, शिंदे गट गुवाहाटीला गेल्यावर त्यांच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचे दहिसर येथील भाषण पाहा. बंडखोरांना दंडुक्याने सुजवा, त्यांचे पार्श्वभाग बडवून काढा, असे व्यासपीठावर जाहीर भाष्य शीतल म्हात्रे यांनी केले होते.

पुढे संजय राऊत म्हणाले, बंडखोरांनी शिवसेना का सोडली?, याचे स्पष्टीकरण त्यांनी आधी द्यावे. खोके मिळाल्यामुळेच बंडखोरांनी शिवसेना सोडली आहे. शिंदे गट आता वैफल्यग्रस्त आहे. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टातील प्रत्येक लढाई शिंदे गट हारणार आहे.