का म्हणाले मोदी सहा महिन्यांनी मोठा राजकीय भूकंप!
-वाचा असे नेमकं काय झाले ?
प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसह इतर आठ राज्यांमधील एकूण ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान, मोदी यांनी बुधवारी (२८ मे) पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा या मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले, “भाजपाला यंदा बंगालमध्ये मोठा विजय मिळेल. मागील निवडणुकीपेक्षा यंदा भाजपा बंगालमध्ये खूप जागा जिंकेल.”
नरेंद्र मोदी या प्रचारसभेत मतदारांना उद्देशून म्हणाले, “तुमचं एक मत देशाची दिशा बदलू शकतं. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यानंतर सहा महिन्यांनी देशात एक मोठा राजकीय भूकंप होईल. घराणेशाहीचं राजकारण घेऊन पुढे चाललेले अनेक पक्ष नष्ट होतील.” मोदींनी यावेळी नेमकं सहा महिन्यांनी काय होईल याबाबत कोणतेही संकेत दिले नाहीत. परंतु, त्यांनी बंगालमध्ये हे भाषण केल्यामुळे त्यांचा रोख ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडे असावा, असं बोललं जात आहे. तर काही राजकीय विश्लेषक याचे वेगळे अर्थ लावत आहेत.
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील प्रचारसभेत बोलताना म्हणाले, “तृणमूल काँग्रेसने बंगालला विकासापासून वंचित ठेवलं आहे. लोकांनाही आता जाणीव झाली आहे की, पूर्ण ईमानदारीने देशाचा विकास कोणी करू शकत असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे मी बंगालमधील मतदारांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या राज्यात भाजपाला मजबूत करा, त्यानंतर भाजपा तुमची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करेल.


