कसे झाले शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान ?
-शी जिनपिंग का ठरताहेत लोकप्रिय
बीजिंग : शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेत. त्यांनी आपल्या नव्या टीमचीही घोषणा केली आहे. या टीममधून त्यांनी आपल्या सर्वच विरोधकांचा सफाया करत आपल्या विश्वासूंना जागा दिली आहे. ली कियांग यांची त्यांनी पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे.
जिनपिंग यांनी शनिवारी तत्कालीन पंतप्रधान ली केकियांग यांची पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली होती. त्यांच्यासह आणखी 3 अधिकाऱ्यांचीही हकालपट्टी करण्यात आली होती. शी जिनपिंग यांनी पॉलिट ब्यूरोच्या स्थायी समितीच्या 7 सदस्यांच्या नावाचीही घोषणा केली आहे. त्यात जिनपिंग यांच्यासह ली कियांग, झाओ लेजी, वांग हुनिंग, काई की, ली शी व डिंग शुशीयांग यांचा समावेश आहे. डिंग सत्ताधारी साम्यवादी पक्षाच्या जनरल कार्यालयाचे संचालक आहेत. ते शी यांचे सर्वात विश्वासू सहकारी मानले जातात. डिंग यांनी जिनपिंग यांच्यासोबत परदेशांतील अनेक महत्वाच्या बैठकांत सहभाग घेतला आहे.
-सुन चुनलान पॉलिट ब्यूरोच्या एकमेव महिला
25 वर्षांत प्रथमच चीनच्या साम्यवादी पक्षाच्या पॉलिट ब्यूरोत एकाही महिलेला स्थान मिळाले नाही. सुन चुनलान सीसीपीच्या पॉलिट ब्यूरोच्या एकमेव महिला सदस्या होत्या. त्या आता रिटायर झाल्या आहेत. चिनी साम्यवादी पार्टी अर्थात सीसीपी महिलांना समानतेचा दर्जा देण्याचा दावा करते. पण वस्तुस्थिती वेगळी आहे.
– 11 महिलांसह 205 सदस्य
सीसीपीच्या बैठकीत पक्षाच्या सदस्यांनी नव्या केंद्रीय समितीसाठी मतदान केले. त्यात 11 महिलांसह 205 सदस्य आहेत. हीच समिती पॉलिट ब्यूरोच्या सदस्यांची निवड करते. बैठक संपल्यानंतर केंद्रीय समितीची बैठक होते. त्यात पॉलिट ब्यूरोचे 25 सदस्य व स्थायी समितीच्या 7 सदस्यांची निवड केली जाते.


