कर्नाटक विजय : राहुल गांधी का म्हणतात ‘आज मी थांबणार नाही’

कर्नाटक विजय : राहुल गांधी का म्हणतात ‘आज मी थांबणार नाही’
– व्हिडिओ ट्विट करत दिले कॅप्शन

प्रतिनिधी
कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणुकांचे कल समोर येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस चांगलीच आघाडी घेत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींनी एक व्हिडिओ ट्विट करत, मी अजिंक्य आहे, मला विश्वास आहे, आणि आज मी थांबणार नाही. असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये त्यांच्याबरोबर अनेक नेते देखील असल्याचं पाहायला मिळत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कर्नाटकची उपराजधानी आणि सीमावासियांचा आत्मा असलेल्या बेळगावमध्ये काँग्रेसने 18 पैकी 11 जागांवर आघाडी घेतली आहे. सकाळी अकरापर्यंतच्या ट्रेंडनुसार काँग्रेस 118 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून मोठी उलथापालथ झाली नाही तर संख्याबळात बदल होण्याची अपेक्षा नाही. सत्ताधारी भाजप 71 जागांवर आघाडीवर असून, बहुमताच्या फार मागे आहेत. त्यावेळी राज्यात किंगमेकर बनण्याची आशा असलेला जेडीएस 28 जागांवर पुढे आहे.

दुसरीकडे, कर्नाटकातील काँग्रेसला एकही संधी हातातून निसटू द्यायची नाही यासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः तेथे उपस्थित असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार नक्कीच स्थापन होईल. इतर पक्षांसोबत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, कर्नाटकातील गौरीबिदानूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार केएच पुट्टास्वामी गौडा 11,000 मतांनी आघाडीवर आहेत. एबीपी लाईव्हवर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. काँग्रेसच्या पाठिंब्याच्या मुद्द्यावर मवाळ भूमिका दाखवत, निकाल आल्यावर बोलू, असे सांगितले.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच दोन बलाढ्य गट आमनेसामने आले आहेत. पहिला गट ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा तर दुसरा गट डीके शिवकुमार यांचा आहे. दोन्ही नेत्यांचे समर्थक उघडपणे एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी या दोन्ही नेत्यांमधील चुरस आणखीच वाढली आहे.