एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीला जाण्याचे कारण आले समोर
-‘ठाकरे ब्रॅण्ड’ पुन्हा बळकट होण्याची शक्यता
प्रतिनिधी
मुंबई : २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘धर्मवीर’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रतिष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून दिसून आला. एकसंध शिवसेनेत फूट पडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात शिंदे यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. त्यातील एक महत्वाचा प्रसंग म्हणजे- गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदे व त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जातात. गुरुपौर्णिमेनिमित्त ते बाळासाहेबांचे पाय धुऊन त्यांच्याविषयी असलेली निष्ठा दाखविताना दिसून येतात. परतीच्या प्रवासात शिंदे हेदेखील आनंद दिघे यांचे पाय धुतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. या दृश्यांमधून शिंदे यांना केवळ एक निष्ठावान शिवसैनिकच नव्हे, तर दिघे यांच्या वारशाचा खरा उत्तराधिकारी म्हणूनही दाखवण्यात आलं.
एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपाबरोबर हातमिळवणी करणारे एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बुधवारी नवी दिल्लीत गेले. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री व सध्याचे राजकीय संरक्षक म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांची भेट घेतली. काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची राजकीय स्थिती अधिकाधिक कमकुवत होत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामागचं कारण म्हणजे- मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र आल्याने ‘ठाकरे ब्रॅण्ड’ पुन्हा बळकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर भाजपा व शिंदे गटातील नेत्यांमध्ये मतभेद निर्माण होत असल्याचंही समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची घेतलेली भेट अधिकच चर्चेचा विषय ठरली आहे.
जून २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या छायेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठी गती मिळाली. भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर थेट मुख्यमंत्रिपदाची सूत्रेच शिंदेंच्या हातात आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं भाजपा नेत्यांना वाटत होतं; पण पंतप्रधान मोदी व अमित शाह यांच्या हस्तक्षेपानंतर फडणवीसांना अखेर उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंनी शिवसेनेची मोट बांधून, स्वत:ची वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे भाजपाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. तरीही उद्धव ठाकरे यांच्याशी लढण्यासाठी भाजपानं शिंदे यांनाच प्राधान्य दिलं.


