उपराजधानी चर्चेत; राष्ट्रवादीचे हे नेते म्हणतात, मुख्यमंत्री जयंत पाटीलच!
-सुप्त संघर्ष उघड
प्रतिनिधी
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणारे बॅनर लावले आहे. यामुळे उपराजधानी पुन्हा राजकीय चर्चेत आली आहे. दरम्यान, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारच्या सांगली दौऱ्यात राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील हेच भावी मुख्यमंत्री असतील, असे स्पष्टपणे सांगितले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजितदादा विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष स्पष्टपणे दिसून आला.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते भाजपसोबत जाणार काय, अशी चर्चा रंगत असताना पुण्यानंतर आता नागपुरातही अजित पवारांच्या समर्थनात बॅनरबाजी सुरू झाली आहे. या बॅनरवर ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का, मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादाच पक्का’ असा मजकूर लिहिलेला असून राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहे. नागपुरातील लक्ष्मीभुवन चौक, बर्डीसह इतर परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहे.
राज्याच्या राजकारण हे मागील काही महिन्यांपासून अस्थिर झाले आहे. एकीकडे शिंदे सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चा प्रचंड जोर धरत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे.’ असे सांगत शरद पवारांनी राज्याचा राजकारणात काही तरी मोठी घडामोड होण्याचे संकेतच दिले आहेत. मात्र, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या तरी सारं काही आलबेल नसल्याचीही चर्चा आहे.
जयंत पाटील यांची राज्याला गरज : डॉ. अमोल कोल्हे
जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसजवळ जयंत पाटलांच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अजित पवार हे भाजपशी सलगी करणार का, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे.


