उद्धव सेनेच्या या बड्या नेत्याची बंडखोरीची भाषा
-काँग्रेस उमेदवारांची डोकेदुखी वाढणार
प्रतिनिधी
नागपूर : पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो. माजी पंतप्रधान नरसिंहराव, काँग्रेसचे हेविवेट नेते मुकुल वासनिक यांच्यासह अनेक दिग्गजांनी येथून निवडणूक लढवलेली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवार ठरवण्यावरून हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. तो तिढा सुटतो न सुटतो तोच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पूर्व विदर्भ संघटनप्रमुख सुरेश साखरे यांनी येथून बंडखोरी करण्याचे ठरवले आहे. उद्या, बुधवारी ( 27 मार्च ) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघ परंपरागत शिवसेनेचा असताना तो काँग्रेससाठी सोडण्यात आल्याने साखरे यांनी आधीच नाराजी दर्शवली होती. रामटेक हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कृपाल तुमाने आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते या शिवसैनिकांनी तो प्रत्येकी दोन वेळा जिंकला आहे. विद्यमान खासदार तुमाने हे शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. या मतदारसंघावर पहिला हक्क शिवसेनेचा आहे. आम्ही शिवसेनेच्या नेत्यांना वारंवार रामटेकचा इतिहास सांगितला. कुठल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडू नका अशी विनंती केली.


