उचलबांगडी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राबाहेर ?
-मात्र, अफवा असल्याचे राजभवनचे स्पष्टीकरण
-सुमित्रा महाजन येणार असल्याची चर्चा
प्रतिनिधी
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागेवर लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याची ती निव्वळ अफवा आहे. याबाबत सोशल माध्यमात चर्चा सुरू होती.
राजभवन येथील सूत्रांकडून राज्यपालांची बदली झाल्याबाबतच्या चर्चांचे खंडन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी हे कायम आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या वक्तव्यापासून राजकारणाबाबत अलीकडे जास्त चर्चेत आले. त्यांच्याकडून शिवाजी महाराज, समर्थ रामदास आणि मुंबईवरून झालेली वक्तव्ये वादग्रस्त ठरली. त्यामुळे ते सर्वांनाच चांगले परिचित आहेत. विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या काळात उडालेले खटके तसेच 12 आमदारांची नियुक्ती, अशा त्यांच्या विविध भूमिकांबाबत चांगल्याच चर्चेत आहे.
-तीन वर्षांतील कारकीर्द वादळी
5 सप्टेंबर 2019 रोजी कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी विराजमान झाले होते. त्यांची कारकीर्द तीन वर्षात वादळी आणि वादग्रस्त ठरली होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारशी असहकार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. मविआने सांगितलेल्या राज्यपालनियुक्त बारा आमदारांची त्यांच्याकडून नियुक्ती झाली नाही. यावरून बराच गदारोळ माजला होता. महाविकास आघाडीकडून कोश्यारींची इतरत्र बदली करण्यात यावी, अशी अनेक वेळा मागणी केली आहे.
-राज्यातील व्यक्ती नसावी, असा संकेत
राज्यपालपदी म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही त्याच राज्यातील व्यक्ती नसावी, असा सामान्यतः संकेत आहे. लोकसभेच्या अध्यक्षा राहिलेल्या सुमित्रा महाजन यांचा जन्म हा महाराष्ट्रातील आहे. महाजन याचे माहेरही महाराष्ट्रातील आहे. सासर मात्र मध्यप्रदेशातील आहे. यामुळेच त्यांचे दोन्ही राज्यात राज्यपालपदी नियुक्ती होणे शक्य होणारी दिसत नाही.
– कोण आहे सुमित्रा महाजन ?
सुमित्रा महाजन यांचा जन्म चिपळूण येथील. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईत आले. सुमित्रा महाजन या विवाहानंतर इंदूरमध्येच स्थायिक झाल्या. 1989 ते 2019 अशा सलग आठ वेळा इंदूर लोकसभा मतदार संघातून त्या निवडून आल्या. लोकसभेचे अध्यक्ष पदसुद्धा त्यांनी भूषविले आहे.


