इंडिया’ च्या तिसऱ्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे का आहे आग्रही

इंडिया’ च्या तिसऱ्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे का आहे आग्रही?

-काँग्रेसलाही हवा आहे मान

प्रतिनिधी
मुंबई : २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपविरोधासाठी एकवटलेल्या २६ पक्षांच्या ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स’ची (इंडिया) तिसरी महत्त्वपूर्ण बैठक २५ व २६ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. त्याचे यजमानपद आपल्याला मिळावे यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आग्रही आहे, तर देशभरात भाजपविरोधी प्रमुख पक्ष म्हणून आघाडीवर असलेल्या काँग्रेसलाही हा मान हवा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची शुक्रवारी शरद पवारांकडे बैठक होऊन त्यात या विषयावर चर्चा झाली.

यशवंतराव चव्हाण सेंटरमधील या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आमदार संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे (पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, रोहित पवार आ. सुनील भुसारा आदी नेते उपस्थित होते.

लोकसभेच्या जागा वाटपसाठी समन्व्यय समिती

मुंबईच्या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आघाडीच्या ११ सदस्यांची समन्वय समिती स्थापन झाली आहे. यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आप, संयुक्त जनता दल, आरजेडी, उद्धव सेना, राष्ट्रवादी (पवार गट), झारखंड मुक्ती मोर्चा, समाजवादी पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य असेल. छोट्या पक्षांना स्थान नाही.

२०२४ ची निवडणूक पाहता संयुक्त आंदोलन आणि मोर्चांचे आयोजन करणाऱ्या पॅनलची घोषणा करण्याचीही शक्यता आहे. संयुक्त कार्यालयही ठरेल.

२६ पक्षांचे १०० नेते हजर राहील

‘इंडिया’ची पहिली बैठक पाटण्यात झाली, त्याचे यजमान पद नितीशकुमार यांच्या जेडीयूकडे होते. दुसरी बैठक बंगळुरूमध्ये झाली. कर्नाटकात भाजपचा पराभव करून सत्तेवर आलेल्या काँग्रेसकडे या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी होती. तिसरी बैठक आता मुंबईत होत आहे. त्याला देशभरातून भाजपविरोधी पक्षांचे जवळपास १०० महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचाही समावेश आहे.

भाजपाला थेट अंगावर घेणार

२०१९ पर्यंत युतीत असलेली उद्धव सेनेने आता भाजपशी थेट शत्रुत्व स्वीकारले आहे. भाजपने शिवसेना फोडल्याचा राग ठाकरेंच्या मनात आहे. त्यामुळे भाजपला थेट अंगावर घेणारा महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष म्हणून उद्धव सेनेेला देशभर आपली प्रतिमा निर्माण करायची आहे.

मुंबईत अजूनही ठाकरेंबद्दल सहानुभूतीचे वातावरण आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेत आघाडीचे महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्याकडेच असले पाहिजे यासाठी ठाकरेंचा आग्रह.

राष्ट्रवादी संपूर्ण पक्षच भाजपसोबत जाऊ शकतो. तर फुटीनंतरही उद्धव सेनेची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ठाकरे ‘इंडिया’ महत्त्वाचे स्थान मिळवू इच्छितात.