आम्ही लोकसभेला खुले होतो: रामटेकवरून काँग्रेसवर दबाव!
-आघाडीत जागांच्या वाटपावरून रस्सीखेच
प्रतिनिधी
नागपूर : रामटेक हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे, मात्र आम्ही लोकसभेत ही जागा काँग्रेसला सोडताना कुठलाही कद्रूपणा केला नाही, अशी आठवण करून देत विधानसभेत ही जागा शिवसेना ठाकरे गटच लढणार, असे खुद्द उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केल्याने नागपूर जिल्ह्यात सर्व जागा लढणार असे जाहीर करणाऱ्या काँग्रेसला तो इशारा मानला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागांच्या वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर झालेल्या सभेत ठाकरे यांनी भाषणातून जागा वाटपाबाबतची पक्षाची भूमिकाच अप्रत्यक्षपणे मांडली. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र पक्षफुटीमुळे काँग्रेसने या जागेवर दावा केला आणि ठाकरे यांनी तो मान्य करीत ही जागा काँग्रेससाठी सोडली. काँग्रेसने ही जागा जिंकली तरी त्यात शिवसेनेचा वाटा होता. याची आठवण ठाकरे यांनी कळमेश्वरच्या सभेत करून दिली. कारण काँग्रेसने काटोल वगळता रामटेकसह सर्व पाच जागा लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच ठाकरे यांनी रामटेक हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे याची आठवण व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेस नेत्यांना करून दिली. त्यामुळे रामटेकसाठी शिवसेना आग्रही असणार हे स्पष्ट झाले.


