‘आप’चा झेंडा: दिल्लीत मनपा निवडणुकीत पुन्हा दाखविले
– बहुमतासाठी १७५ चे संख्याबळ आवश्यक
प्रतिनिधी
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत हाती आलेले कल पाहता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) स्पष्टपणे आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
सध्या आम आदमी पक्ष १२८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपचे उमेदवार १०६ जागांवर आघाडीवर आहेत. तब्बल ३९ जागांचे निकाल हाती आले आहेत. यापैकी १७ जागांवर आप, २० जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय, काँग्रेस पक्षाचे उमेदवार ११ जागांवर आघाडीवर आहेत. दिल्ली महानगरपालिकेच्या एकूण २५० जागांसाठी मतदान झाले होते. बहुमतासाठी १७५ चे संख्याबळ आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती पाहता आम आदमी पक्षाची बहुमताचा आकडा गाठेल, असे चित्र दिसत आहे.
-आप’ला जवळपास ४३ टक्के मते पडली
दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी गेल्यावेळच्या तुलनेत वाढल्याचे दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत ‘आप’ला जवळपास ४३ टक्के मते पडली आहेत. संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत या आकडेवारीत बदल होऊ शकतो. तर भाजपला आतापर्यंत ३९ टक्के मतं मिळाली आहेत. काँग्रेस पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत मात्र घट झालेली दिसत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत ९ टक्क्यांची घट होऊन त्यांना आतापर्यंत १२.५ टक्के मतं मिळाली आहेत.
-बहुतांश एक्झिट पोल्सचा अंदाज खरा
यापूर्वी बहुतांश एक्झिट पोल्सनी दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज जवळपास खरा ठरताना दिसत आहे. मात्र, केजरीवालांचा आम आदमी पक्ष भाजपला १०० जागांचा टप्पा ओलांडून देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, आम आदमी पक्षाला १४९ ते १७१ जागा मिळू शकतात. तर भाजपची मजल ६९ ते ९१ जागांपर्यंत जाऊ शकते. काँग्रेसला केवळ ३ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अन्यांना ५ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.


