आणखी एका पक्षाची स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत उडी
-अरुण केदारांची जय विदर्भ पार्टी मैदानात
प्रतिनिधी
नागपूर : विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीला नवसंजीवनी देत जय विदर्भ पार्टीने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निवडणुकीत विदर्भातील तरुण, विद्यार्थी, शेतकरी आणि महिलांना संधी देऊन विदर्भाचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प पक्षाने केला आहे.
विदर्भात सर्वच जागेवर जय विदर्भ पार्टी उमेदवार लढवणार असे मत जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांनी सोमवारी डिजिटल मीडिया कार्यालयात पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले.
जय विदर्भ पार्टी ही केंद्र व राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष असून, तिचे मुख्य उद्दिष्ट स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे हे आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, विदर्भात गेल्या अनेक दशकांपासून गरीबी, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या, औद्योगिक स्थैर्याचा अभाव, शिक्षण व आरोग्य सेवेतील तुटवडा, अशा अनेक प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. या सर्व समस्यांचे एकमेव समाधान म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांनी सांगितले की, “विदर्भातील हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक युवकाने आणि विद्यार्थ्याने एकत्र येऊन स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणले पाहिजे. जय विदर्भ पार्टी ही तरुणाईला पुढे आणणारी आणि विदर्भाच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे.”
राष्ट्रीय महासचिव विश्वपंत आष्टीकर यांनी म्हटले की, “नागरी सोयी, स्वच्छ पाणी, मोफत शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगारनिर्मिती यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. पक्षाचे उमेदवार जनतेसमोर या मुद्यांवर ठामपणे लढणार आहेत.”
या पत्रकार परिषदेच्या शेवटी पक्षाचे पदाधिकारी मुकेश मासुरकर, सुधाताई पावडे, श्रीकांत दौलतकर, प्रदीप शिरसकर, सुनील चोखारे, प्रशांत नखाते, राजेंद्र सतई,भोजराज सरोदे, नरेश निमजे, पूजा हटवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


