आज घोषणा :’इंडिया’ च्या जागा वाटपासाठी समित्या ठरणार

आज घोषणा :’इंडिया’ च्या जागा वाटपासाठी समित्या ठरणार

-लोगोचे अनावरण पुढे ढकलले

प्रतिनिधी
मुंबई : इंडिया आघाडीच्या आजच्या तिसऱ्या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोची घोषणा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे, अशी महत्त्वाची माहिती आज राज्याचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरू होण्यापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, लोगोबाबत आमचा विचार सुरू आहे. लोगोबाबत सर्व नेत्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लवकरच त्यानुसार निर्णय होईल. अजून लोगोवर काम बाकी आहे. त्यामुळे आज होणारे लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत जागावाटपाचे सूत्र ठरण्याची शक्यता आहे. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, जागावाटपावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षीयांची आज समिती स्थापण्यावर चर्चा होईल. तसेच, इंडिया आघाडीचा संयोजकाच्या नावाचीही आज घोषणा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

इंडिया आघाडीची पुढील बैठक तामिळनाडूला होईल, अशी महत्त्वाची माहितीही विजय वडेट्टीवार यांनी दिली. विजय वडेट्टीवार म्हणाले, आमच्या वारंवार बैठका होत आहेत, ही खरे तर चांगली गोष्ट आहे. इंडिया आघाडीच्या केवळ दोन बैठका झाल्या तर केंद्र सरकारने सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त केला. आमच्या अशाच बैठका सुरू राहिल्या तर पुढील तामिळनाडूच्या बैठकीआधीही जनतेला काही गिफ्ट मिळू शकते. आमच्या अशा एक, दोन बैठका झाल्या तर पेट्रोल, डिझेलही 40 रुपयांनी स्वस्त होईल, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

दरम्यान, बैठकीपूर्वी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अनिल देसाई म्हणाले, इंडिया आघाडीला देशात वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजप विचलित झाला आहे. याच कारणामुळे भाजप नेते उद्धव ठाकरेंवर व आघाडीच्या नेत्यांवर तुटून पडत आहे. जनता कोणाच्या बाजुने आहे हे भाजपला निवडणुकीत कळेल.