- अमृता यांना अडकविणारा मोठा बुकी महाराष्ट्र पोलिसांच्या हाती
-8 वर्षांपासून होता फरार
प्रतिनिधी
मुंबई : ठाण्यातील कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी याला अखेर मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. गेल्या 8 वर्षांपासून तो फरार होता. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्त केल्याच्या आरोपात अनिल जयसिंघानी हा सहआरोपी आहे. याप्रकरणी अनिल जयसिंघानीची मुलगी व मुख्य आरोपी अनिक्षाला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
अनिल जयसिंघानीची आता मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. तसे, संकेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत दिले आहेत.
–पोलीस अधिकारी व नेत्यांचीही नावे
अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीने चौकशीत अनेक धक्कादायक बाबी सांगितल्या आहेत. माझ्याविरोधात काही सापडत नाही म्हणून माझ्या कुटुंबीयांना अडकवण्यासाठी हा ट्रॅप रचण्यात आला होता. अनिक्षाने जबाबत काही पोलिस अधिकारी व नेत्यांचीही नावे घेतली आहेत. हळूहळू हे सर्व नावे समोर येतील, असा इशाराच फडणवीसांनी विरोधकांना दिला होता.
अनिल जयसिंघानी याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठीच अनिक्षाने अमृता फडणवीसांना लाच देण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप आहे. तसेच, यात अनिल जयसिंघानीचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे अनिल जयसिंघानीच्या चौकशीत आता काय समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचेच ठरणार आहे.
–कोण आहे अनिल जयसिंघानी?
अनिल जयसिंघानी हा मूळचा ठाण्यातील उल्हासनगर येथील. एकेकाळी देशातील सर्वात मोठ्या बुकीमध्ये अनिल जयसिंघानीचे नाव होते. त्याचे सर्वात प्रथम नाव समोर आले ते 2010 मध्ये. ठाण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बेट घेताना पोलिसांनी त्याला प्रथम अटक केली होती. नंतर या क्षेत्रात त्याचे वजन वाढत गेले. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातही त्याचे वजन होते, अशी चर्चा आहे. ईडीच्या गुजरात युनिटने 2015 च्या सुरुवातीला त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केल्यानंतर तो देश सोडून पळून गेला, असेही बोलले गेले. अनिल जयसिंघानीविरोधात महाराष्ट्र, आसाम, गोवा, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये 15 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. बहुतेक प्रकरणे हे सट्टेबाजाशी संबंधित आहे.


