अमरावतीतही भाजपाची परीक्षा : शिंदेसेना, युवा स्वाभिमानने वाढविल्या अडचणी
-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रयत्न अयशस्वी
प्रतिनिधी
अमरावती : महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम रंगात आलेला असताना महायुतीत झालेली बिघाडी, युवा स्वाभिमान या मित्र पक्षाची कुरघोडी, उमेदवारीचा घोळ, निवड समितीवरील आरोप यातून भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असंतुष्टांची समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही आलबेल झालेले नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.
महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पक्षासोबत भाजपची युती होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत तीनही पक्षांमध्ये जागावाटपावरून ओढाताण झाली. अखेरीस शिंदे गट युतीतून बाहेर पडला आणि ७२ जागांवर शिंदे गटाने उमेदवार जाहीर केले. त्यातच युवा स्वाभिमान पक्षानेही ४१ जागांवर आपले उमेदवार जाहीर करून भाजपसमोरील डोकेदुखी वाढवली. अखेरीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीने अमरावतीत पोहचून आमदार रवी राणा यांची समजूत काढावी लागली. त्यातूनही फारसे हाती लागले नाही. भाजपच्या अधिकृत तीन उमेदवारांच्या जागेवर युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. हा सावळागोंधळ सुरू असताना असंतुष्ट थेट रस्त्यावर उतरले. नाराज कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात निदर्शने केली. चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप करण्यात आल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला.
भाजपचे चर्चेतील कार्यकर्ते ॲड प्रशांत देशपांडे हे यावेळी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. त्यांनी तयारीही केली होती, पण त्यांना उमेदवारी देण्यात न आल्याने देशपांडे समर्थक प्रचंड नाराज झाले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ॲड देशपांडे यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. भाजप हा चांगला पक्ष आहे, पण निवड मंडळ नालायक आहे, अशा शब्दात ॲड प्रशांत देशपांडे यांनी आपला रोष व्यक्त केला. निवड मंडळाने केलेल्या चुकीचा फटका भाजपला बसू शकतो, असेही त्यांचे म्हणणे आहे.
आमदार रवी राणा यांनी भाजपच्याच अधिकृत उमेदवारांच्या विरोधात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार देऊन भाजपसमोरील अडचणी वाढवल्या आहेत. आम्ही युवा स्वाभिमान पक्षाला नऊ जागा दिल्या आहेत. त्यामुळे ते इतर ठिकाणांहून माघार घेतील आणि दोन, तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत होईल, असा आशावाद चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला असला, तरी युवा स्वाभिमान पक्ष यावेळी सूड उगवण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी नवनीत राणा यांच्या विरोधात काम केले, त्यांना धडा शिकवायचाच असा चंग बांधून आमदार रवी राणा कामाला लागले आहेत. त्यातही भाजपचेच नुकसान होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेऊन आपला ‘सेक्यूलर’ चेहरा कायम ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण, शिवसेना शिंदे गटाने वेगळी चूल मांडल्याने भाजपसमोर हिंदुत्ववादी मतांच्या विभाजनाचा धोका आहे. युवा स्वाभिमान पक्षानेही रस्त्यात काटे टाकले आहेत. अशा स्थितीत गेल्यावेळी सर्वाधिक ४५ जागा जिंकणाऱ्या भाजपची कामगिरी यंदा कशी राहील, याची उत्सुकता आहे.


