बावनकुळे बरसले : कडू यांचे आंदोलन म्हणजे दुटप्पीपणा

बावनकुळे बरसले : कडू यांचे आंदोलन म्हणजे दुटप्पीपणा

-काँग्रेसच्या भूमिकेचा घेतला समाचार

प्रतिनिधी
नागपूर : माजी आमदार बच्चू कडू यांचे आंदोलन हे दुटप्पी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही स्वतः बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत विधिमंडळाच्या दालनात बैठक घेतली होती आणि त्यांच्या एकेका मुद्द्यावर चर्चा केली. त्यांच्या विषयाशी संबंधित सहा मंत्री उपस्थित होते,असे महसूलमंत्री आणि नागपूर व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमाशी बोलत होते. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची आजपासून सातबारा कोरा पदयात्रा पापळ या गावातून सुरू होत आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, बच्चू कडू यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मी आणि आमच्या मंत्रिमंडळातील सहा खात्यांचे मंत्री साडेचार तास बसलो आणि एक एक प्रश्नावर आम्ही मार्ग काढला.त्यांना आम्ही लेखी आश्वासन ही दिले होते.

पावसामुळे नुकसान होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही असे सांगून महासूलमंत्री म्हणाले, पीक पाण्यासाठी लागणारा योग्य असा पाऊस सध्या पडतो आहे. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत पहिले विषय हे पीक पाण्याची परिस्थिती काय आहे, जलसंपदा विभागाची परिस्थिती काय आहे, पावसामुळे काय नुकसान झाले आहे का ? यासंदर्भात असतात.
पावसामुळे नुकसान तर होत नाही ना याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार लक्ष ठेवून आहे असेही बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी नेहमीच कॉंग्रेसचा अपमान केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत आहे,यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,की उद्धव ठाकरे यांनी नेहेमीच कॉंग्रेसचा अपमान केला आहे. आता कॉंग्रेस पक्षाने विचार करायचा की त्यांना किती अपमानित व्हायचं आहे.तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे नुकसान झाले.खरे तर,उद्धव ठाकरे यांनी जिद्दीने कॉंग्रेस पक्षाच्या जागा घेऊन त्यांना कमी केले आहे.मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा जो नाकर्तेपणा होता तो कॉंग्रेसच्या अंगाशी आला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कॉंग्रेस पक्ष त्यावेळी त्या सरकारमध्ये होता. त्यामुळे त्यावेळेचे मुख्यमंत्री काम करत नव्हते, विधानभवनात , मंत्रालयात येत नव्हते.उद्धव ठाकरे सरकारची अँटी इन्कम्बन्सी कॉंग्रेसवर आली कॉंग्रेसचे नेते हतबल होते. त्यामुळेच आता कॉंग्रेसची स्थिती फार वाईट झाली असल्याचे बावनकुळे म्हणाले.

गरीब लोकांची संख्या वाढत आहे आणि संपत्ती काही श्रीमंत लोकांच्या हातात केंद्रित होत असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे, यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आर्थिक दुर्बल व्यक्तींपर्यंत सरकारच्या योजना , सरकारचा लाभ पोहचला पाहिजे. तो लाभ पोहचवण्यासाठी काही गोष्टी कमी पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. ती योजना सर्व घरांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आम्हाला काम करण्याची गरज आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या की तो व्यक्ती बाहेर निघेल. त्यामुळे आम्ही यावर पक्ष म्हणूनही आणि सरकार म्हणूनही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.