या नेत्यांनी लिहिले पत्र : बोलवा ससंदेचे विशेष अधिवेशन

या नेत्यांनी लिहिले पत्र : बोलवा ससंदेचे विशेष अधिवेशन

-ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ला

प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढल्यानंतर शनिवारी शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर रविवारी ११ मे रोजी दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी पत्र लिहिले आहे. सद्यस्थितीत ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती या पत्रातून विरोधकांनी केली आहे.

लोकसभेतील विरोधी नेते राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, “सर्व विरोधी पक्षांच्या एकमताने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती करत आहे. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा जाहीर केलेल्या शस्त्रविरामावर चर्चा करणे हे लोकांसाठी आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी अत्यंत गरजेचे आहे. पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला एकमताचा निर्धार प्रदर्शित करण्याची ही एक संधी असेल. राज्यसभेतील विरोधी नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही एका पत्राद्वारे राहुल गांधी यांच्या विनंतीला पाठिंबा दर्शविला आहे.

याआधी २८ एप्रिल रोजी या दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. “संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, जेणेकरून लोकप्रतिनिधी त्यांची एकता आणि दृढ निश्चय दाखवू शकतील असा विश्वास विरोधी पक्षांचा आहे”, असे राहुल गांधी यांनी आधीच्या पत्रात म्हटले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेस पक्षाने सरकारच्या सर्व निर्णयांना अधिकृतपणे पाठिंबा देला आहे. मात्र, पक्षातील सूत्रांचे असे म्हणणे आहे की, “सद्यपरिस्थितीबाबत तसंच प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाक यांच्यातील मध्यस्थीबद्दल सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात करतील.”
“भारत आणि पाकिस्तानमधील वाटाघाटींमध्ये कोणताही तिसरा पक्ष कधीही सहभागी नाही असे सरकार कायम म्हणत आहे. तेव्हा ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा कशी केली, याबाबत येत्या काळात आम्ही प्रश्न उपस्थित करू”, असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.