राहुल गांधींनी केले भाजपाचे कौतुक, म्हणाले,…?
-शेअर केले अमित शाह यांचे ते बयान
प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज (३० एप्रिल) देशात जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. आगमी जनगणनेत जातीनिहाय गणना केली जाणार आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी देखील या निर्णयाबद्दल सरकारचं कौतुक केलं आहे. दरम्यान, भाजपाने मात्र या निर्णयाचे श्रेय घेण्यावरून राहुल गांधी यांना सुनावले आहे.
राहुल गांधी या निर्णयाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याबरोबरच भाजपाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे २०२४ मधील एक विधान देखील शेअर केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले होते की जातीनिहाय जनगणना करण्याचा कोणताही निर्णय जनगणना जाहीर झाल्यावर सार्वजनिक केला जाईल.
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राहुल गांधींवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की राहुल गांधी यांनी सरकारच्या निर्णयाचे श्रेय घेणे थांबवावे कारण अमित शाह यांनी १८ सप्टेंबर २०२४ रोजीच ही घोषणा लवकरच होणार असल्याचे संकेत दिले होते.
“राहुल गांधी यांनी सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे श्रेय घेणे थांबवावे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यापूर्वीच १८ सप्टेंबर २०२४ रोजी ही घोषणा लवकरच होणार असल्याबद्दल सूचित केले होते. २०२१ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणना सुरू केली, ज्यामध्ये जातीय घटकाचा समावेश होता- १९३१ नंतर करण्यात आलेला हा पहिलाच असा प्रयत्न होता,” असे मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


